Tata Business News : टाटा मोटर्सचा एसबीआयसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (एसबीआय) तीन वर्षांचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. टाटा मोटर्सच्या छोट्या व कमी वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीमध्ये वित्तीय सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने हा एमओयू करण्यात आला आहे. रोजगाराला बढावा देण्यासोबतच या सहयोगामुळे टाटा मोटर्सच्या बीएस 6 श्रेणीतील वाहनांसाठी मागणी वाढवण्यातही या ठरावाची मदत होणार आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून दोन्ही व्यावसायिक संस्था, कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत एकसमानता व पारदर्शकता राखण्यासाठी तसेच, टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी, एसबीआयच्या काँटॅक्टलेस लेंडिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ म्हणाले, देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाशी सहयोग करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. देशात 22 हजारांहून अधिक शाखा असलेल्या एसबीआयचे देशभरात विस्तृत जाळे आहे आणि या भागीदारीच्या माध्यमातून आमची व्याप्ती, विशेषत: ग्रामीण भागात दृढ करण्यात मदत होईल. यामुळे रोजगारनिर्मितीत हातभार लागेल तसेच आमच्या ग्राहकांना अनोख्या पद्धतीने वित्तीय सहाय्य पुरवणेही शक्य होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी या भागीदारीबद्दल म्हणाले, देशभरातील व्यावसायिक वाहन ग्राहकांना व डीलर्सना अनोख्या वित्तीय सेवा देऊ करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या काँटॅक्टलेस लेण्डिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांचा बँकिंग अनुभव मोठ्या प्रमाणात वाढवू शकू तसेच, रिटेलर्सना लाभ देऊ शकू अशी आशा वाटते असे, शेट्टी म्हणाले.

एसबीआयबरोबर झालेल्या या करारामुळे टाटा मोटर्सच्या सीव्ही ग्राहकांना फारसे अडथळे न येता कर्ज उपलब्ध होईल. एसबीआयच्या अनोख्या तंत्रज्ञानप्रेरित उत्पादनांचाही लाभ घेता येईल. या सहयोगाद्वारे सुलभ कर्जरचना असलेल्या योजना आणल्या जातील. यामुळे बीएस4 व बीएस 6 वाहनांच्या किंमतीतील फरक भरून काढणे, डाउन पेमेंट तसेच वाहनाचा ईएमआय हे सर्व हाताळणे सोपे होईल.

ठळक वैशिष्ट्ये –
– तीन वर्षांच्या सामंजस्य ठरावाच्या (एमओयू) माध्यमातून टाटा मोटर्स एसबीआयच्या विस्तृत ग्रामीण व्याप्तीचा लाभ घेणार

– कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत एकसमानता, पारदर्शकता राखण्यासाठी तसेच टर्न अराउंड टाइम (टीएटी) कमी करण्यासाठी एसबीआयच्या कॉण्टॅक्टलेस लेण्डिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार

– टाटा मोटर्सच्या सर्व छोट्या व कमी वजनाच्या व्यावसायिक वाहनांना लागू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.