TDR Scam : टीडीआर घोटाळ्यात शहरातील तिन्ही आमदारांचा सहभाग; महाविकास आघाडीचा आरोप

एमपीसी न्यूज – कथित टीडीआर घोटाळ्यात मोठा आर्थिक (TDR Scam) गैरव्यवहार झाला असून पुणे – बेंगळुरू महामार्गा लगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ 200 रुपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली. आजच्या बाजार मूल्याचा विचार केला तर यामध्ये सुमारे दीड हजार कोटींहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह स्थानिक तिन्ही आमदारांचा समावेश आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला. हा विषय नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, गणेश भोंडवे, अनंत कोऱ्हाळे, संतोष सौंदणकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

तुषार कामठे म्हणाले, वाकड येथील आरक्षित भूखंडाच्या विकासासंबंधी मे. विलास जावडेकर इन्फिनिटी डेवलपर्स यांच्या सोबत महापालिकेने केलेला करार हा बाजार किंमतींपेक्षा अधिक किंमत देऊन करण्यात आला आहे. मोक्याच्या ठिकाणची जागा अशा पद्धतीने देणे चुकीचे आहे. बांधकामाची किंमत आणि टीडीआरची किंमत यामध्ये खूप मोठी तफावत आहे. शहरात टीडीआर संबंधित 12 बांधकामे सुरु आहेत, त्या बांधकामाची किंमत 26620 रुपये चौरस मीटर आहे, मात्र वाकड येथील टीडीआर घोटाळ्यात ही किंमत 65069 रुपये चौरस मीटर आहे. सुमारे 38 हजार रुपयाने टीडीआर महापालिकेने फुगवला आहे. यामध्ये दीड हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका असणार आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही कामटे म्हणाले.

ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तीन आमदार आहेत. परंतु या घोटाळ्यावर त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला नाही. ते गप्प का आहेत, त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आमदार या (TDR Scam) घोटाळ्यात सहभागी आहेत का असा प्रश्न जनता विचारत आहे. हा विषय नगरविकासमंत्रालयाच्या अंतर्गत येतो.

त्यामुळे मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाला आहे. महापालिकेने 122 क्रमांकाचे आरक्षण बाहेरच्या विकासकाकडून विकसित करण्यापेक्षा महापालिकेने आपल्या ताब्यातील जागेचा विकास स्वतः करावा. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. पालिकेने अनेक आरक्षणे ठेकेदारांना विकासासाठी दिली आहेत.

Pune : माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू दीपक हळदणकर यांचे दुःखद निधन

महापालिकेचे आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून महापालिकेची निवडणूक खोळंबली असल्यामुळे प्रशासकीय राज सुरू आहे. आयुक्तांचा भ्रष्टाचाराचा सुसाट कार्यक्रम सुरू आहे. सरकारने याची चौकशी करून भ्रष्ट अधिकरी व दोषींवर कारवाई करावी, वेळ पडल्यास अटक करावी. महापालिकेचे जे आर्थिक नुकसान होत आहे याकडे लक्ष दिले नाही तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा चाबुकस्वार यांनी दिला.

 

ॲड. सचिन भोसले म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे घोटाळे होत आहेत. हा घोटाळा आत्ताच कसा होतो हे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. यापूर्वीही पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये टीडीआर घोटाळा झाल्याचे आपण पाहिले आहे. सरकारने घोटाळ्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. पालकमंत्री, आमदार या घोटाळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने कारवाई केली नाही तर जनआंदोलन करू, गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा भोसले यांनी दिला.

 

डॉ.कैलास कदम म्हणाले, भाजपच्या मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्यामध्ये शहरातील तिन्ही आमदारांचा सहभाग आहे. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. गेल्या सात वर्षात जे घोटाळे झाले आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.