Pune News : पदाधिकाऱ्यांच्या दालनातील कंत्राटी सेवक होणार कार्यमुक्त

एमपीसी न्यूज – महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात आल्यावर, पुढील दोन दिवसात महापालिकेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनांचा ताबा नगरसचिव कार्यालयाने घेण्यास सुरूवात केली आहे तर याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी सेवकांना पुढील आठवड्यात कार्यमुक्त केले जाणार आहे.

नगरसचिव कार्यालयाने महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती, विविध पक्षनेते यांची दालने व सभागृहांसह, अ‍ॅण्टी चेंबर बंद केले आहेत़ सध्या यातील सर्व फाईल गोळा करणे, महापालिकेशी संबंधित वस्तू, कागदपत्रे एकत्र करून त्यांची नोंद करून हा सर्व दस्तावेज स्टोअर रूममध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे़ ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर 31 मार्चनंतर येथे कार्यरत असलेले सर्व कंत्राटी सेवक हे कार्यमुक्त केले जाणार आहे.

याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या दालनात असलेले स्वीय सहाय्यक, लिपिक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही येत्या सोमवारपासून नगरसचिव कार्यालयात करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात येणार आहे तसेच सोमवार नंतर महापालिकेच्या नवीन इमारतीत असलेली पदाधिकाऱ्यांची सर्व दालने सील केली जाणार असल्याची माहिती नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.