Chinchwad : रस्ता भरकटलेला चिमुकला दहा मिनिटात परतला आईच्या कुशीत

आयुक्त आर के पद्मनाभन यांची 'पोलीस चौकीत नाही चौकात दिसला पाहिजे' ही संकल्पना पुन्हा यशस्वी

एमपीसी न्यूज – घराजवळ फिरता फिरता गल्लीच्या बाहेर पडून सुमारे अर्धा किलोमीटर लांब दुस-या चौकात आल्यानंतर त्याला घरची आठवण झाली. त्याने त्याच्या समवयस्क मुलाजवळ घरी जाण्याविषयी विचारले. पण फिरत आलेल्या चिमुकल्याला त्याच्याकडून मदत मिळाली नाही. म्हणून दोघांनी मिळून एका मोठ्या मुलाला विचारले आणि मोठ्या मुलाने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मुलाला अवघ्या दहा मिनिटात सुखरूप घरी पोहोचवले. हा नाट्यमय प्रसंग आज (शुक्रवारी) दुपारी एक ते दीडच्या सुमारास चिंचवड येथे घडला. यामुळे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सुरु केलेली ‘पोलीस चौकीत नाही चौकात दिसला पाहिजे’ ही संकल्पना पुन्हा सार्थ ठरली आहे.

फार विदारक आणि रोमांच जागवणारी घटना असली तरच ती फिल्मी होते, असं काही नाही. घटना अगदी लहान असतात पण त्यातून कोण कसा मार्ग काढतो हे मात्र फार महत्वाचं असतं. आपण चुकलोय, नवीन जागेत आलोय याची भीती वाटत असली तरी इतरांची मदत घेत एका चार वर्षाच्या चिमुकल्याने घर गाठलं. हे ऐकायला साधारण वाटत असलं तरी आजकाल शहरात घडत असलेल्या घटना पाहता आपला मुलगा मृत्यूच्या दाढेतून परत आल्याची भावना त्या मुलाच्या घरचे व्यक्त करत आहेत.

दगडोबा चौक, चिंचवड येथे राहणारा रुद्र गोटे हा चार वर्षांचा एक चिमुकला आज दुपारी एकच्या सुमारास घराजवळ खेळत होता. घराजवळ खेळता खेळता तो रमत गमत रस्त्याने चालू लागला. जसजसं पुढे जाईल तसतसं त्याला नवीन काहीतरी पाहायला मिळत होतं. तो बघत पुढे पुढे जात राहिला. तो काही वेळात घरापासून तब्बल 500 मीटर दूरवर असलेल्या चिंतामणी चैकात येऊन पोहोचला. चौकात सगळीकडे वाहने, माणसांची वर्दळ दिसू लागली. थोडा वेळ चौकात थांबल्यानंतर पुढे कुठे जावे, हे सुचले नाही. म्हणून त्याने घरी जायचे ठरवले. पण तो घरची वाट विसरला होता. त्याला नव्या शहरात आल्यासारखं वाटू लागलं. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तरीही त्याने सुरुवातीला त्याच्या वयाच्या अन्य एका मुलाला घरी जाण्याविषयी सांगितलं. पण नवीन मित्राला ना त्याचं नाव माहिती होतं ना त्याचा पत्ता. त्यामुळे नवीन मित्र त्याची काहीही मदत करू शकला नाही.

पहिला प्रयत्न फसला. आता घरचा पत्ता मिळेल की नाही या विचाराने तो अजूनही घाबरला. पण अशातही त्याने मदत मागण्याचा दुसरा प्रयत्न केला. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलाला त्याने घरी जायचं आहे, असं सांगितलं. मोठ्या मुलाला देखील रुद्रचा पत्ता किंवा नाव काहीच माहिती नव्हतं. म्हणून त्याने लगेच 100 नंबर डायल केला. पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. नियंत्रण कक्षाने चिंचवड पोलीस ठाण्यातील टीम नंबर दहाला याबाबत माहिती दिली. टीम नंबर दहामधील पोलीस हवालदार विठ्ठल शिंदे, पोलीस नाईक विजय भुसारे, पोलीस शिपाई विनोद सोनवणे, शिवलाल दुबे, गोरख जोगदंड, संजय अहिरे, विशाल आंबटवार, महिला पोलीस नाईक वर्षा सपकळ हे सर्वजण तात्काळ चिंतामणी चौकात पोहोचले.

पोलिसांनी रुद्रचा ताबा घेतला आणि त्याच्याकडे घरच्या पत्त्याविषयी चौकशी केली. पण त्याला घरच्या पत्त्याविषयी किंवा त्याच्याविषयी काहीही माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी परिसरात तातडीने चौकशी केली. रुद्रने एका वळणावर हात दाखवला, म्हणून पोलीस त्यादिशेने पुढे गेले. तेव्हा त्यांना दूरवर माणसांचा एक घोळका दिसला. काय झालं हे पाहण्यासाठी टीम तिकडच्या दिशेने गेली असता त्यांना रुद्रचा पत्ता मिळाला. रुद्र मागील काही वेळापासून गायब असल्याने त्याच्या घरचे घाबरले होते. त्यांनी परिसरात शोधाशोध करून पोलीस ठाण्याचा रस्ता देखील धरला होता. इतक्यात रुद्र घरी आल्याचे समजताच घरचे अर्ध्या रस्त्यातून परत घरी आले. पोलिसांनी रुद्रची आई शीतल बालाजी गोटे यांच्याजवळ रुद्रला सोपवले. आईकडे जाताच रुद्र रडणे विसरला होता. त्याच्या चेह-यावर एक वेगळीच आनंदाची चमक आली होती. त्याच्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती मिळताच आईने सुटकेचा निःश्वास सोडला.

टीम नंबर दहाने याबाबत नियंत्रण कक्षाला कळवले आणि सर्वजण आपापल्या मार्गाला लागले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस बळाच्या संख्येनुसार टीम तयार करण्यात आल्या आहेत. एखाद्या टीमला एखादी जबाबदारी दिली की पोलीस देखील प्रामाणिकपणे आणि वेळेत काम करत असल्याची ही पोहोचपावती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.