Chinchwad : राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून राज्यातील 11 कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसतेय – लक्ष्मण जगताप

The State Government is ignoring 11 crore citizens by pointing a finger at Central Government says MLA Laxman Jagtap.

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे राज्यातील मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघु उद्योजक अशा सर्वांना पुन्हा शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे. या सर्वांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून काही तरी मदत जाहीर होईल आणि कोरोनमुळे उद्‌ध्वस्त झालेले आयुष्य सावरण्यासाठी सामान्यांना आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे. ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचे आणि राज्यातील 11 कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसायची एवढाच उद्योग या सरकारकडून सुरू आहे, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.

राज्यातील सर्वसामान्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर पोहोचावा आणि उशिरा का होईना सरकारने जागे होऊन जनतेच्या भल्यासाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी भाजपने “माझे आंगण, माझे रणांगण” हे आंदोलन केल्याचे सांगत आमदार जगताप म्हणाले, “राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. आज देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी सरकारचे अयोग्य नियोजन जबाबदार आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये कोठेही एकवाक्यता दिसत नाही.

सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये गडबड गोंधळ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा महासंकटाच्या काळात सरकारचे निर्णय गोंधळलेले असल्यास जनतेमध्येही गोंधळ निर्माण होतो. तशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्ष म्हणून भाजपने आतापर्यंत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्याचा गैरसमज होऊन राज्यातील जनतेला होणारा त्रास सरकारला दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघुउद्योजकांचे झाले आहे. अजूनही त्यांना पुढे काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही. आपले पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे.

या सर्वांचे होणारे हाल राज्य सरकारला दिसत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही तरी ठोस मदत करेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवून राज्यातील 11 कोटी जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत आहे.

जनतेची होणारी ही फसवणूक थांबावी आणि त्यांच्या पदरात काही तरी मदत पडावी, यासाठी भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला. आता तरी सरकार जागे होईल आणि कोरोनामुळे आयुष्य उद्‌ध्वस्त झालेल्या या नागरिकांसाठी मदतीची घोषणा करेल, अशी आशा आहे.

सरकारने राज्यातील जनतेसाठी 50 हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.