BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शनिवार व रविवार भाजे धबधब्याकडे जाणारा मार्ग सायंकाळी चार वाजता होणार बंद

0
INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज : कार्ला लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला या ठिकाणी शनिवार व रविवारी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता सायंकाळी चारनंतर वरील पर्यटनस्थळांवर जाणारे मार्ग कार्ला फाटा येथे बंद करण्यात येणार आहे.
पावसाळी पर्यटनासाठी ग्रामीण भागातील भाजे लेणी धबधबा, कार्ला लेणी धबधबा, लोहगड व विसापूर किल्ला परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करु लागल्याने या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत होऊ लागली आहे. याचा सर्वाधिक त्रास स्थानिक नागरिकांना होत असल्याने या परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता वरील पर्यटनस्थळांकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कार्ला फाटा येथे सायंकाळी चार नंतर बंद करण्यात येणार आहे. तसेच भाजे धबधबा हा सायंकाळी साडेपाच नंतर बंद करण्यात येणार असून लेणी व गड किल्ले भागात गेलेल्या पर्यटकांना माघारी काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
लुकडे म्हणाले भाजे लेणी तसेच लोहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता अरुंद व खड्डेमय असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहन उभे राहिल्यास वाहतूक कोंडी होते. मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासंतास कोंडीत अडकून पडावे लागले. पर्यटक व स्थानिक नागरिक यांना या वाहतूक कोंडीमुळे होत असलेले त्रास व संभाव्य धोके ध्यानात घेत हे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पर्यटकांनी या बदलाची नोंद घ्यावी. तसेच पर्यटकांनी हुल्लडबाजी व मद्यप्राशन करणे टाळावे अन्यथा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सुतोवाच लुकडे यांनी केले आहे.
येणार्‍या शनिवार व रविवारी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी रोखण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी मुख्यालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविला असून काही स्थानिक युवकांना देखील स्वंयसेवक म्हणून सोबत घेण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करत शिस्त पाळावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A1
.