Sunil Shelke : खोट्या आरोपांबाबत ‘साहेबां’ना भेटून विचारणा करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – ‘कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याने अपयश झाकण्यासाठी माझ्याविषयी काहीजणांनी शरद पवार साहेबांना खोटी माहिती दिली व त्याची शहानिशा न करता साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. या संदर्भात मी लवकरच साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे विचारणा करणार आहे,’ अशी प्रतिक्रिया मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

लोणावळा येथे झालेल्या संवाद सभेत शरद पवार यांनी आमदार शेळके (Sunil Shelke) यांना जाहीरपणे खडसावले. शरद पवार यांच्या सभेला जाऊ नये म्हणून आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप पवार यांनी केला. यापुढे असा प्रकार झाला तर माझे नावही शरद पवार आहे, असे त्यांनी शेळके यांना सुनावले. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शेळके यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

Maval : माझ्या वाट्याला गेलात तर मी सुद्धा शरद पवार आहे; शरद पवार यांचा सुनील शेळके यांना सज्जड इशारा

मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 90 टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. अजितदादांच्या पाठीशी असलेले 33 कार्यकर्ते देखील लोणावळ्याच्या सभेत उपस्थित नव्हते. त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या 33 कार्यकर्त्यांची तरी नावे जाहीर करावीत, असे आव्हान शेळके यांनी केले. मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केलेला एकही कार्यकर्ता पवार साहेबांनी माझ्यासमोर उभा करून दाखवावा, असे प्रतिआव्हानही आमदार शेळके (Sunil Shelke) यांनी दिले.

शरद पवार यांच्या विषयी आपल्या मनात आदर असून यापुढे तो आदर कायम राहील. त्यांनी शहानिशा न करता माझ्यावर आरोप करणे, चुकीचे आहे. येत्या काही दिवसांत मी त्यांची समक्ष भेट घेऊन त्यांना विचारणार आहे. मी दमदाटी केलेला एक तरी कार्यकर्ता त्यांनी दाखवून द्यावा, असे शेळके म्हणाले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत 133 कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगून तालुक्यातील काही नेत्यांनी साहेबांना या कार्यक्रमासाठी बोलावले होते. प्रत्यक्षात 33 कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला नाही. फारशी गर्दी न झाल्यामुळे सभेचा फज्जा उडाला. हे अपयश झाकण्यासाठी काही मंडळींनी साहेबांच्या कानावर खोटी माहिती घातली, असा पलटवार शेळके (Sunil Shelke) यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.