Thergaon News : सासरची मंडळी मुलीला मारहाण करत असल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुलीच्या सासरची मंडळी मुलीला मारहाण करत होती. त्यामुळे मुलीचे वडील भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी सासरच्या लोकांनी वडिलांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी सात वाजता जय मल्हार नगर, थेरगाव येथे घडली.

शिवाजी बाबुराव पाडुळे (वय 65, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आजिनाथ आप्पा धर्मे, सुमन आप्पा धर्मे, रंजना बाळासाहेब पाडुळे, संपत बाळासाहेब पाडुळे, मंगेश बाळासाहेब पाडुळे, रेश्मा संपत पाडुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहीण रतन धर्मे यांना आरोपी आजिनाथ आणि सुमन यांनी लग्न झाल्यापासून किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण केली. सुमन धर्मे हिने लोखंडी रॉड डोक्यात मारला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे आई, वडील गेले. फिर्यादी यांच्या वडिलांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याचे माहिती असून आरोपींनी त्यांना छातीत व शारीरिक हाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. याबाबत सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आजिनाथ, सुमन, रंजना आणि मंगेश या चौघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.