Pimpri : पावसांच्या सरीसह आकुर्डीत तुकोबांची पालखी विसावली; पहाटे ठेवणार पुण्याकडे प्रस्थान

महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप 
 
एमपीसी न्यूज – जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी 333 वा पालखी सोहळ्याने गुरुवारी देहूगावातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पहिला मुक्काम इनामदार वाड्यात केल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. दर मजल करत पालखी सोहळा सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला होता. शहरवासियांनी वारक-यांचे उत्साहात स्वागत केले. साडेसहाच्या दरम्यान पावसाचे आगमन झाले अन् वारक-यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. पावसांच्या सरीसह आकुर्डीत पालखी विसावली असून उद्या (शनिवारी) पहाटे पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. 
 
देहूतील इनामदार वाड्यातून आज सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. वारकरी उन्हामध्ये दरमजल करत पंढरीचे वाट चालण्यात मग्न होते. माळवाडी, झेंडेमळा, देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि देहूकरांचा निरोप घेऊन पुणे-मुंबई महामार्गाने पालखी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. या ठिकाणी पालिकेतर्फे स्टेज उभारला होता. दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. 
 

त्यानंतर पालखी आकुर्डीतील पालखी स्थळावर विसावली. मागील 30 वर्षांपासून संत तुकाराम महाराज यांची पालखी आकुर्डी येथे मुक्कामी असते. पालिकेच्या वतीने खासगी व महापालिकेच्या अशा 36 शाळांमध्ये वारक-यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करुन दिली असून टेन्टंमध्ये राहणा-या वारक-यांसाठी आकुर्डीत 300 पोर्टेबल टॉयलेट उपलब्ध केले आहेत.  
 
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच अन्नदान देखील करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वारक-यांच्या स्वागतासाठी स्टेज उभारले होते. दिंडीतील विनेक-यांना राष्ट्रवादीचा लोगो असलेली छत्री वाटण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, जावेद शेख, मयुर कलाटे, नगरसेविका वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते. महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे वारक-यांना बुंदीचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका मीनल यादव, माजी नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी वारक-यांची सेवा केली.

"warkaeyanna
 
"ncp"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.