Pune News : शिवाजीनगर मतदारसंघामध्ये स्वच्छतागृह पाहणी अभियान

एमपीसी न्यूज – आरोग्याच्यादृष्टीने नीटनेटके, स्वच्छ आणि सर्व सुविधांनीयुक्त असे सार्वजनिक स्वच्छतागृह असावे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझ्या मतदारसंघातील सर्वच स्वच्छतागृहांची पाहणी करण्याचे अभियान हाती घेतले आहे, अशी माहिती शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या हद्दीत मिळून 100 हून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृह पाहणी करून नागरिकांशी चर्चा करणे, त्यांच्या सूचना, समस्या समजून घेणे आणि त्याआधारे या सर्व स्वच्छतागृहांची संपूर्ण पाहणी झाल्यावर एकत्रित अहवाल करून प्रशासन आणि मतदारसंघातील नगरसेवक यांच्या सहाय्याने स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा घडवून आणून या कामाचे एक मॉडेल उभे करण्याचा मानस असल्याचे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘स्वच्छ स्वच्छतागृह हा तुमचा अधिकार….. माझी जबाबदारी’, असे घोषवाक्य या अभियानासाठी दिले आहे. माझ्या मतदारसंघातील सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी मी घेत आहे, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी त्यांच्या मतदारांना दिले आहे.

अभियानाचा प्रारंभ प्रभाग क्रमांक 7 खैरेवाडी, इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत यांची पाहणी करुन 11 ऑक्टोबर रोजी करण्यात आला तसेच याच प्रभागातील गोखलेनगर भागातील आठ स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. दरम्यान, प्रभाग क्रमांक आठ मधील शिवाजी मित्रमंडळ, बोपोडी गावठाण, हमाल चाळ, देवबाई चाळ, पाटील पडळ वस्ती, औंध रोड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुद्धा पाहणी करण्यात आली. यापुढील महिन्याभरात उर्वरित स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील या पाहणी अभियानात नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका राजश्रीताई काळे, तसेच गणेश बगाडे, आनंद छाजेड, सुनील माने, सचिन अंकेलू, महेंद्र उर्फ बंडू कदम, योगेश बाचल, अपर्णाताई गोसावी, किरण ओरसे, किरण बदामी आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. औंध आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.