Nigdi : रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईतांना अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही गुन्हेगारांवर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. त्यातील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दोन गुन्हे एकत्रित केले आहेत.

ऋतिक रतन रोकडे (वय 19, रा. चिंतामणी नगर, चिखली), सचिन दीपक लोखंडे (वय 21, रा. भाऊसाहेब रोकडे चाळ, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण साम्राज्य टोळीतील ऋतिक आणि सचिन हे दोघेजण मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बेकायदेशीरपणे पिस्तूल देण्यासाठी निगडी येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंकुश चौक येथे सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यावरून दोघांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ऋतिक रोकडे याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात चार, निगडी पोलीस ठाण्यात दोन आणि वाकड पोलीस ठाण्यात एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तर सचिन लोखंडे याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तीन, चिंचवड पोलीस ठाण्यात एक आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार कैलास बाबडे, प्रमोद लांडे, प्रवीण दळे, महादेव धनगर, पोलीस नाईक तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चोरगे, पोलीस शिपाई प्रदीप गाडे, स्वप्नील शिंदे, गोपाल ब्रह्मदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.