Pimpri : खबरदार! चोरीची वाहने घ्याल तर तुम्हीही व्हाल आरोपी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून दुकानांसमोर, रस्त्याच्या बाजूला, घर, सोसायट्यांचे पार्किंग, मोकळी मैदाने, दवाखान्याचे पार्किंग अशा प्रत्येक ठिकाणावरून वाहने ( Pimpri ) चोरीला गेली आहेत. मागील सहा महिन्यात 704 वाहने शहरातून चोरीला गेली असून त्यातील अनेक वाहने कमी किमतीत विक्री केल्याचे काही प्रकरणांमध्ये उघडकीस आले आहे. अशी चोरीची जुनी वाहने घेणाऱ्यांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने कमी पैशांत वाहन घेण्याच्या मोहापायी अनेकजण गुन्हेगार होऊ लागले आहेत.

मागील सहा महिन्यात 704 वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील अडीचशे पेक्षा अधिक वाहनांचा शोध लागला असून उर्वरित सुमारे 450 वाहनांच्या बाबतीत गेली कुठे, अशी अवस्था वाहन मालकांची आणि पोलिसांचीही झाली आहे. शहराच्या बाहेरील वाहन चोरांच्या टोळ्या शहरात येऊन वाहनांची माहिती काढून ती चोरी करून नेत असल्याचे देखील प्रकार घडले आहेत.

पिंपरी-चिंचवड ही कामगार नगरी आहे. शहरात दररोज कामानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत जात असतात. खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाताना काहीजण चोरीची वाहने ट्रॅव्हल्समध्ये घालून इतर शहरांमध्ये वाहने नेतात. इथे चोरलेली वाहने पाच-दहा हजार रुपयांना इतर शहरात विकली जातात. वाहनांची कागदपत्रे नंतर आणून देण्याच्या बोलीवर मिळेल ती रक्कम घेतली जाते. गरजू, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी अशा प्रकरणांमध्ये अडकले जातात.

Today’s Horoscope 06 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वाढत्या महागाईमुळे नवीन वाहन खरेदी करणे अनेकांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे जुने वाहन खरेदी करण्याला सध्या अनेकजण पसंती देत आहेत. ओळखीच्या व्यक्तींकडून, गॅरेज चालकांकडून, एजंट, ऑनलाईन माध्यमातून जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. वाहने खरेदी करताना वाहनांची कंडिशन बघितली जाते. मात्र कमी पैशांमध्ये वाहन ( Pimpri ) मिळत असल्याने कागदपत्रांची खातरजमा करण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. नंतर पोलीस घरी आल्यानंतर आपण खरेदी केलेले वाहन चोरीचे आहे, हे लक्षात येते.

अशा प्रकारात चोरीची वाहने खरेदी करणारे नागरिक देखील पोलिसांच्या लेखी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी होतात. त्यामुळे पडताळणी न करता वाहन खरेदी करणे जोखमीचे ठरू शकते. जुने वाहन खरेदी करताना त्या वाहनांची कागदपत्रे पडताळून पहा. माहितगार व्यक्तीकडे त्याची चौकशी करा. ज्याच्या नावावर वाहन आहे, त्या मालकाशी चर्चा करा. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर नियमभंग केल्याबाबत दंड आकारला आहे का, याची खात्री करा. एखाद्याने वाहन चोरी करून ते विकत असेल तर अशा व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.

चोरीची वाहने विकत घेणाऱ्यांवरही होते कारवाई
पोलिसांनी एखादा वाहनचोर पकडल्यास त्याने चोरलेली वाहने कुठेकुठे विकली आहेत, त्याचा शोध घेतला जातो. ती वाहने खरेदी करणाऱ्यांकडे चौकशी करत त्यांनाही ताब्यात घेतले जाते. जुने वाहन विकत घेताना संबंधितांकडून वाहनांची कागदपत्रे घेणे, त्याचे रीतसर रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असते. मात्र चोरीच्या वाहनांच्या बाबतीत असे काहीही घडत नाही. अवघ्या काही ( Pimpri ) हजार रुपयांमध्ये ही वाहने कागदपत्रे नंतर देण्याच्या अटीवर विकली जातात. चोरीची वाहने खरेदी करणाऱ्यांना दोन ते चार वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

ऑनलाईन वाहन घेताना हलगर्जीपणा नको
मी सैन्य दलात नोकरीस आहे. आता माझी दुसऱ्या राज्यात बदली झाली आहे. त्यामुळे माझी दुचाकी मला अर्जंट विकायची आहे. असे सांगून ऑनलाईन संकेतस्थळावरून वाहन विक्रीच्या जाहिराती दिल्या जातात. वाहनाचे फोटो टाकून त्यासोबत एखाद्या सैन्य दलात नोकरीस असल्याचे गणवेशातील फोटो, ओळखपत्र अशी बनावट कागदपत्रे देखील पाठवली जातात. पैसे स्वीकारून वाहन दिलेच जात नाही. त्यामुळे ऑनलाईन वाहन खरेदी करताना प्रत्यक्ष वाहन पहा. वाहन मालकाला भेटा आणि मगच पुढील व्यवहार करा.

पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे म्हणाले, “वाहनांची अथवा इतर मालाची चोरी करण्यासाठी ( Pimpri ) सहकार्य करणे देखील गुन्हा आहे. चोरीची वाहने खरेदी करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे. जुनी वाहने घेताना कागदपत्रांची तपासणी करूनच वाहने खरेदी करावीत.”

सहा महिन्यात चोरीला गेलेली वाहने
सायकल – 14
दुचाकी – 638
तीनचाकी – 30
चारचाकी – 36

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.