Pune News : भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्यानेच किरीट सोमय्यांवर हल्ला, ही तर झुंडशाही – उदयनराजे

एमपीसी न्यूज – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले असून संचेती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संचेती रुग्णालयात जाऊन किरीट सोमय्या यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्यानेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, ही तर झुंडशाहीची नांदी असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून म्हटले.

उदयनराजे भोसले आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांच्यावर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन, किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अशा हल्याच्या घटना घडल्यास अश्या घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही.

दरम्यान किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर भाजप आक्रमक झाले असून यापुढे अशा घटना घडल्या तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.