Tribute to Lata Mangeshkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज राजकारणी व कलाकारांनी वाहिली लता दीदींना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – अनेक दशकं संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या जेष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मागील 28 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण करत, लता दीदी यांच्या निधनाने शब्दापलीकडे दुःख झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनाने देशात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्या लता दीदी यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.’

देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती म्हणाले, ‘लताजींचे निधन जगभरातील लाखो नागरिकांप्रमाणेच माझ्यासाठी हृदयद्रावक आहे. त्यांची असंख्य गीते भारताचे सार आणि सौंदर्य दर्शवतात, कैक पिढ्यांना आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात आढळते. भारतरत्न लताजींची कामगिरी अतुलनीय राहिल.’

‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

‘लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.’ अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी देखील लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच अनेक मराठी व हिंदी कलाकारांनी लातादीदी यांच्या सोबतच्या आठवणीना उजाळा देत भारताचा अजरामर आवाज आज शांत झाल्याची म्हटले आहे.

दरम्यान, लतादीदी यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वज देखील दोन दिवस अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.