US Corona Deaths : एप्रिल-मेमधील मृत्यू तांडवानंतर जूनमध्ये मृत्यूंचे प्रमाण लक्षणीय घटल्याने अमेरिकेला मोठा दिलासा

US Corona Death Toll: Significant drop in the death toll in June after April-May ordeal, अमेरिकेत एप्रिलमध्ये 58,857 तर मे मध्ये 42,414 कोरोना बळी, जूनमध्ये आतापर्यंत 15,815 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद

एमपीसी न्यूज –  एप्रिल आणि मेमध्ये अमेरिकेत मृत्यूने अक्षरशः तांडव केले होते. या दोन महिन्यांत मिळून अमेरिकेत एक लाखांपेक्षा अधिक बळींची नोंद झाली, मात्र जूनमध्ये अमेरिकेतील कोरोना मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. एप्रिल-मेमध्ये कित्येक दिवस दोन हजारांपेक्षा अधिक बळींची नोंद झालेल्या अमेरिकेत काल (रविवारी) मृतांचा आकडा 267 इतका खाली आला आहे. हा तब्बल 90 दिवसांतील सर्वांत कमी आकडा आहे, त्यामुळे अमेरिकेला फार मोठा दिलासा मिळाला आहे. 

अमेरिकेत गेल्या पाच महिन्यांतील कोरोना बळींची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

  • फेब्रुवारी – 1 कोरोना मृत्यू
  • मार्च – 5 हजार 161 कोरोना मृत्यू
  • एप्रिल – 58 हजार 857 कोरोना मृत्यू
  • मे – 42 हजार 414 कोरोना मृत्यू
  • 21 जूनपर्यंत – 15 हजार 815 कोरोना मृत्यू

अमेरिकेतील कोरोना बळींची एकूण संख्या 1 लाख 22 हजार 247 वर पोहचली आहे. त्यापैकी एक लाख 06 हजार431 मृत्यू हे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये नोंदविले गेले आहेत. जूनमध्ये अमेरिकेतील कोरोना मृत्यूंचा आलेख मात्र झपाट्याने खाली येत असल्याचे पहायला मिळत आहे.

मृतांचा आकडा 19 दिवस दोन हजारांपेक्षा अधिक

31 मार्च ते 30 मार्च या 61 दिवसांपैकी सात दिवसांचा अपवाद वगळता दररोजची कोरोना बळींची आकडा सातत्याने एक हजारच्या वर राहिला आहे. त्यापैकी 19 दिवस तर तो दोन हजारांच्या वर होता. 21 एप्रिलला अमेरिकेत एका दिवसांत 2,693 इतक्या सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली होती. एप्रिल व मे महिन्यात दरदिवशी सरासरी 1745 कोरोनाबाधितांचा मृत्यू होत होता. काही केल्या मृतांचे प्रमाण कमी होत नसल्याने अमेरिका अक्षरशः हतबल झाल्याचे जगाने पाहिले आहे.

जूनमध्ये फक्त चार दिवस मृतांचा आकडा हजारच्या पुढे 

जून महिन्यात दोन, तीन, चार व नऊ जून हे चार दिवस वगळता अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा एक हजारांच्या खाली राहिलेला आहे. सात जूनला 373, 14 जूनला 331 तर 21 जूनला 267 इतका तो खाली आला आहे. काल तर भारतापेक्षाही अमेरिकेत कमी बळींची नोंद झाली. एप्रिल- मेमध्ये एका दिवसातील कोरोना मृत्यूंची सरासरी 1,745 होती, ती सरासरी जूनमध्ये 753 पर्यंत खाली आली आहे. त्यात दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.