Nigdi – भाजपचे ‘जोडे मारा’ आंदोलन, चिनी वस्तुंची होळी करुन नोंदवला निषेध

BJP's 'Jode Mara' agitation, a protest against Holi of Chinese goods

एमपीसी न्यूज – लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील वीस जवानांना वीरमरण आले. चीनच्या या हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने प्राधिकरणातील भेळ चौकात रविवारी सायंकाळी चिनी वस्तुंची होळी करून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर आर.एस. कुमार, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शिनकर, भाजपा पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सलीम शिकलगार, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अनुप मोरे, भाजपा शहर चिटणीस माणिक फडतरे, भाजपा शहरउपाध्यक्ष राजेंद्र बाबर यांची उपस्थिती होती.

यावेळी नागरिकांना आवाहन करताना शर्मिला बाबर म्हणाल्या की, ‘चीन भारताला मोठ्या प्रमाणावर वस्तुंची निर्यात करून अब्जावधी रुपयांची कमाई करतो. या कमाईतून लष्करावर प्रचंड प्रमाणात खर्च करून चीन भारतीय सीमेवर सातत्याने उपद्रवी कारवाया करतो.

स्वस्त किमतीच्या प्रलोभनाला बळी पडून असंख्य नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक चिनी बनावटीच्या वस्तू वापरतात. चीन सीमेवर नुकत्याच घडलेल्या दुष्कृत्याच्या निषेधार्थ पक्षीय राजकारण, मतभेद बाजूला ठेवून भारतीयांनी एकजुटीने, संयमाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला; तर देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

शैलजा मोरे म्हणाल्या की, ‘चीन हा विस्तारवादी देश असल्यामुळे शेजारी देशांशी त्याचे संबंध कायम विवादास्पद राहिले आहेत; परंतु भारतासारख्या जगातील मोठ्या लोकशाही देशातील नागरिकांनी देशहितासाठी चीनची आर्थिक कोंडी केली ; तर निश्चितच चीनचे कंबरडे मोडेल.

या प्रसंगी नागरिकांच्या वतीने नारायण पांडे, श्रीकृष्ण अभ्यंकर, नीलिमा कोल्हे, मनीषा पोळ, योगेश भागवत, आशिष राऊत, प्रसेन अष्टेकर, विजय नेहरे, नितीन हगवणे, सागर घोरपडे यांनी दैनंदिन घरगुती चिनी वस्तुंची होळी करून तसेच शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करताना ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय!’ अशा घोषणा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.