New York: बापरे! अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरूच, कोरोनाच्या बळींचा आकडा 50 हजार 236

एमपीसी न्यूजजागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूचा काल (गुरुवारी) एका दिवसात कोरोनाबाधित तब्बल 2 हजार 325 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 50 हजारच्या घरात जाऊन पोहचला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 236 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 8 लाख 80 हजार 204 इतकी झाली आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.  

अमेरिकेत कोरोनाबाधितांचे यापूर्वी 15 एप्रिलला 2,618 मृत्यू झाले होते. तो नरसंहाराचा विक्रम मंगळवारी (21 एप्रिल) मोडला गेला. मंगळवारी अमेरिकेत एका दिवसात 2,665 बळी गेले. 14 व 17 एप्रिलला एका दिवसात अडीच हजारांपेक्षा अधिक बळी गेल्याची नोंद आहे. 14 एप्रिलला 2,553 तर 17 एप्रिलला 2,528 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर एका दिवसातील मृतांची संख्या 1,561 पर्यंत खाली आल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र कोरोना मृत्यूंच्या संख्येने एकदम उसळी घेतल्याने केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे.

जगातील कोरोनाबाधितांपैकी 32.40 टक्के कोरोनाबाधित हे एकट्या अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 80 हजार 204 इतकी असून आतापर्यंत 50 हजार 236 जणांचा मृत्यू झाला असून 85 हजार 922 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 7 लाख 44 हजार 437 इतके सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 2 लाख 68 हजार 581 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 20 हजार 861 पर्यंत वाढला आहे. काल (गुरुवारी) न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात 507 कोरोना बळी गेेले आहेत. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 25 झाली असून बळींची संख्या 5,428 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगनमध्ये मृतांचा आकडा 2,977 इतका झाला आहे. मॅसेच्युसेट्स, ल्युसियाना, कॅलिफोर्निया, , फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हा जगातिक सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरचा हल्ला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामागे असणाऱ्यांना शोधून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे थैमान – 6,601 बळी! गुरुवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 2,325

यू. के. – 638

फ्रान्स – 516

इटली – 464

स्पेन – 440

ब्राझील – 407

जर्मनी – 260

बेल्जियम – 228

कॅनडा – 173

नेदरलँड – 123

टर्की – 115

मेक्सिको – 113

इराण – 90

स्वीडन – 84

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.