World Cup Semi Final 1 : शमीच्या सात विकेट! न्यूझीलंडला धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत शानदार प्रवेश

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या वीस वर्षांपासून अबाधित असलेल्या 49 शतकांच्या विक्रमाला मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्याच्याच उपस्थितीत मागे टाकणाऱ्या विराट कोहलीच्या 50 व्या विश्व विक्रमी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघापुढे 398 धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे केले होते, ज्याला उत्तर देताना न्यूझीलंड संघाने अतिशय चिवट अशी झुंज देत जोरदार प्रतिकार केला खरा, पण भारतीय गोलंदाजांनी फलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाचा धावांनी पराभव करत 2019 च्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड करून आपला हिशोब चुकता केला आहे. मोहम्मद शमीनेआपल्या कारकिर्दीत केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या (57 धावात 7 बळी)जोरावर 70 धावांनी पराभव करत अहमदाबादच्या भव्यदिव्य मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात शानदार प्रवेश केला आहे.

2019 च्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्धच भारतीय संघाचा 2023 च्या विश्वकप स्पर्धेतला उपांत्य फेरीचा सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जात आहे, ज्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने कोहलीच्या विश्वविक्रमी शतकाच्या जोरावर, कर्णधार रोहीतच्या स्फोटक सलामीच्या जोरावर, युवा गीलच्या शुभ खेळीच्या तर श्रेयस अय्यरच्या आणखी एका सातत्यपूर्ण खेळीच्या जोरावर 398 धावांचे विशाल लक्ष्य ठेवत हिशोब चुकता करण्याच्या दृष्टीने पहिले पण दमदार पाऊल टाकले होते पण झुंजार किवी संघाने दिलेल्या चिवट लढतीमुळे सामना चांगलाच रोमहर्षक झाला ,पण अखेर भारतीय संघा ने दबावातही आपला सर्वोत्तम खेळ दाखवल्याने यजमान भारतीय संघाने 12 वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वकप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीसाठी एक दमदार पाऊल टाकत दिमाखात प्रवेश केला आहे.

नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. दोन्हीही संघांने आपल्या अखेरच्या सामन्यात खेळवलेलाच संघ कायम ठेवला. डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात रोहितने 10 धावा चोपत शानदार सुरवात करून दिली, तर या वर्षभरात जबरदस्त फॉर्मात असलेल्या गीलनेही साऊदीच्या पहिल्या आणि सामन्याच्या दुसऱ्या षटकात दोन खणखणीत चौकार मारत कर्णधार रोहितचाच कित्ता गिरवला. याच सुरुवातीचा कहर तिसऱ्या षटकात तसाच बहरत वाढत गेला जेंव्हा रोहितने बोल्टच्या दुसऱ्या षटकात मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू थेट प्रेक्षकांत भिरकावून दिला. यावेळी भारतीय संघाच्या जयघोषणांनी प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले.रोहितचा आजचा मूड अतिशय खतरनाक होता, त्याने आणखी एक षटकार मारत या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 26 तर एकूण 50 षटकार मारत आणखी एका विक्रमाला आपल्या नावावर केले.या धडाक्यात केवळ 5 षटकातच भारतीय संघ आपल्या अर्धशतकी सलामी पूर्ण करेल असे वाटत होते, पण गीलने पुढील तीन चेंडू शांतपणे खेळून काढत भागीदारी कशी बनते हे दाखवून देत होता.

रोहितने केवळ 18 चेंडूत 3 चौकार आणि तीन देखणे षटकार मारत या 47 धावांच्या भागीदारीत 33 धावा चोपून” कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट”चा सोदाहरण दाखला देत होता.

पूर्ण भरात असलेल्या रोहितच्या फलंदाजी इतके देखणे सौंदर्य लताबाईचे गाणे, मधूबालाचे आरस्पानी सौंदर्य यांच्या इतकीच देखणे असते.त्याचा फक्त निखळ आनंद घ्यावा, बस्स!

न्यूझीलंड संघाचे चाहते जगभर आहेत, मी ही त्यांच्या संघाचा ,खिलाडूवृत्तीचा फार मोठा चाहता आहे,पण त्याहीपेक्षा मी सगळ्यात मोठा फॅन आहे,रोहितच्या अशाच आक्रमक फलंदाजीचा. याच न्यूझीलंड संघाने विश्व कप स्पर्धा 2019 मध्ये आपल्याला उपांत्य फेरीत गारद करत असंख्य भारतीय चाहत्यांना निराश केले होते, तशीही ही टीम आपल्याला वर्ल्ड कप इतिहासात सतत आडवी जाते ,असे म्हटले जाते पण आज रो सुपरहिट शर्माचा आवेश असा काही होता की त्याच्या स्फोटक फलंदाजपुढे ही तगडी किवी गोलंदाजी पहिल्या काही षटकात तरी पालापाचोळा झाली.

त्याने आज या विश्व कप स्पर्धेत 50 षटकार मारणारा पहिला फलंदाज हा बहुमान पटकावला.रोहीत आज जबरदस्त फलंदाजी करणार असे वाटत असतानाच 47 धावांवर असताना आणखी एक उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात तो केन विल्यमसनच्या शानदार झेलामुळे अर्धशतक पूर्ण न करताच साउदीच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण त्याआधी रोहितने केवळ 29 चेंडूत 4 चौकार आणि तितकेच षटकार मारत घणाघाती 47 धावा केल्या आणि संघाला केवळ 50 चेंडूत 70 धावांची स्फोटक सलामी देवून तो तंबूत परतला.

यावेळी काही क्षण तरी संपूर्ण मैदानात सूनसान शांतता पसरली होती. त्याच्या जागी आला तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विक्रमादित्य विराट कोहली. त्याने डावाला पुढे नेताना गीलला सुरुवातीला फक्त साथ देणेच पसंत केले. गीलने सुरवातीला जरी फारशी आक्रमक फलंदाजी केली नसली तरीही त्याने केवळ 41 चेंडूतच आपले या विश्वकप स्पर्धेतले चौथे अर्धशतक पूर्ण करताना 7 अतिशय देखणे, पण तितकेच कलात्मक चौकार आणि एक शानदार षटकार मारत आपले अर्धशतक महत्वाच्या सामन्यात आपले वैयक्तिक 13 वे अर्धशतक पूर्ण करताना तो महत्वाच्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे हेच सिद्ध केले.

त्याने केलेल्या याशानदार फलंदाजीमुळे भारताने 20 व्या षटकातच आपले दीडशतक फलकावर लावले. यात अर्ध्या (74) धावा गीलच्या होत्या. भारतीय संघासाठी उपांत्य फेरीच्या सामन्यासाठीची ही जणू शुभच बात होती. सगळे काही छान चालू आहे असे वाटत होते मात्र नेमके याचवेळी शुभमन गीलच्या स्नायू आखडल्यामुळे नाईलाजाने तो रीटायर हर्ट होवून 79 धावांवर असताना तंबूत परतला.भारतीय संघासाठी ही जरी काहीशी काळजीची बाब असली तरी भारतीय संघासाठी शुभमनचे पूर्णपणे फीट होणे जास्त महत्वाचे होते, त्यामुळेच रोहितने त्याला तंबूत परत बोलावले.

त्याच्या जागी खेळायला आला तो आणखी एक शानदार फॉर्मात असलेला फलंदाज म्हणजेच श्रेयस अय्यर. दुसऱ्या बाजूला असलेल्या कोहलीच्या एकाग्रतेला मात्र कोणीही भंग करू शकले नाही. आज त्याने आणखी एक विक्रम पार केला. वैयक्तिक 46 धाव पूर्ण करताच त्याने रिकी पोंटिंगच्या 13,722 धावांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचा विक्रम नेस्तनाबूत करत आपले नाव दुसऱ्या क्रमांकावर आणले. आता त्याच्या पुढे फक्त महान सचिन तेंडुलकरच आहे.याचबरोबर त्याने आणखी एक आणि विश्वकप स्पर्धेतले 6 वे अर्धशतक पूर्ण करुन भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येची आसही दाखवली. याचबरोबर त्याने एका वर्ल्डकपमध्ये 8 वेळा 50 वा याहून अधिक धावा करुन सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे माहीत आहे?बांगलादेशचा शकिब हसन.

कोहलीचे इथून पुढे असे अगणित विक्रम होतीलच, पण आज वानखेडेवर असलेल्या असंख्य क्रिकेट रसिकांइतकेच जगभरातून टीव्हीच्या माध्यमातून सामना बघत असलेल्या प्रेक्षकांना आजच्या सामन्यातल्या भारतीय संघाच्या विजयासोबत आणखी एका विक्रमाची प्रचंड आतुरता होती ती म्हणजे कोहलीचे 50 वे विक्रमी शतक. ते व्हावे याची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रेक्षकांना त्याने आज 80 वी धाव पूर्ण करताच एका विश्वकप स्पर्धेत 674 धावा करुन तेंडुलकरचा सर्वाधिक 673 धावांच्या विक्रमालाही मागे सोडले. दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने आजही शानदार फॉर्म चालूच ठेवत आपल्या संघातल्या सर्वात अनुभवी खेळाडूला उत्तम साथ दिली.त्याने केवळ 35 च चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ही त्याची सलग चौथी अर्धशतकी वा त्याहून जास्त धावांची खेळी.बघता बघता ही भागीदारीही चांगलीच जमली.40 व्या षटकाखेरीस या जोडीने 123 धावांची बहुमूल्य पण तितकीच वेगवान भागीदारी करून संघाला 287 धावांचा टप्पा गाठून दिला.

उरलेल्या 10 षटकात हातात असलेले गडी यामुळे भारतीय संघ 380 पर्यंत मजल मारेल असे वाटत होते. याच्या आधी जगभरातल्या सच्चा क्रिकेट प्रेमींना दिवाळीचा आनंद तेंव्हा साजरा करता आला जेंव्हा विराटने आज महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या अनेक वर्षांपासून अबाधित असलेल्या 49 शतकाच्या विक्रमाला मागे टाकत एकदिवसीय सामन्यात 50 शतक करणारा जगातला पहिला फलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला.विराटने केवळ 291 सामन्यातच अशी कामगिरी करुन हा विक्रम आणखीच अजरामर केला. विशेष बाब म्हणजे हा विक्रम मोडत असताना दुसरा विक्रमवीर सचिन तेंडुलकर दस्तुरखुद मैदानात उपस्थित होता. त्याचबरोबर फुटबॉल मधला आणखी एक मोठा खेळाडू डेविड बेकहेम सुद्धा मैदानावर उपस्थित होता.

तमाम भारतीयांची मान गर्वाने उंचावत विराटने आपले नाव खऱ्या अर्थाने अजरामर केले.शतक झाल्या नंतर तो जोरदार फटकेबाजी करत होताच की एक उंच फटका मारण्याच्या नादात तो 117 धावांवर असताना साउदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तो बाद होवून तंबूत परतत असताना तमाम प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्यांचा कडकडाट करत आपल्या या लाडक्या विश्वविक्रमवीराला शानदार मानवंदना दिली.

मुंबईच्या दमट हवामानात शरीरातील क्षार कमी होतात, हे माहीत नसेल असा क्रिकेट रसिक भारतातच काय जगभरातही नसेल, पण त्याच मैदानावर विराटने आजच्या या मोठया सामन्यात केलेली विश्वविक्रमी खेळी प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या हृदयात चिरकाल राहील.त्याच्या या दृढनिश्चयी खेळीचे महत्व तुमच्या तेंव्हा लक्षात येईल जेंव्हा आपल्या विश्व कप स्पर्धेतल्या पहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या अन त्याच्या पेक्षा 12 वर्षांने लहान असलेल्या गीलला खेळायला येता आले नाही.

विराटने रचलेल्या पायावर कळस करणारी खेळी करत श्रेयस अय्यरने केवळ 67 चेंडूतच आपले सलग दुसरे शतक करत शानदार खेळी केली. उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात त्याने अशी खेळी करून भारतीय संघाच्या विजयाचा खऱ्या अर्थाने पाया रचला असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.श्रेयसच्या या शतकात 3 चौकार आणि 9 षटकार सामील होते.या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 4 बाद 397 धावांची विशाल धावसंख्या रचून न्यूझीलंड संघापुढे मोठे आव्हान ठेवले होते,ज्याला किवी संघ कसे उत्तर देतो हे बघणे औत्सुक्याचे होते.

न्यूझीलंड संघाच्या डावाची सुरुवात त्यांच्या संघासाठी सातत्यपूर्ण खेळ करत असलेल्या रचीन रवींद्रन आणि देवोन कॉंवेने शानदाररीत्या केली.बुमराहच्या पहिल्याच षटकात कॉंवेने दोन खणखणीत चौकार मारत आम्ही कच खाणारे नाही आहोत असाच जणू इशारा दिला. खराब चेंडूवर खणखणीत फटके मारत हे दोघेही धावा जोडत होते. 5 षटकात 30 धावा जोडल्यानंतर रोहितने सिराजच्या ऐवजी आपल्या हूकमी अस्त्राला म्हणजेच शमीला गोलंदाजी दिली अन त्याने पहिल्याच चेंडूवर कॉंवेला चकवले आणि के एल राहुलने झेप घेत एक अप्रतिम झेल घेत त्याची छोटी खेळी समाप्त करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.

त्याच्या जागी खेळायला आला तो कर्णधार केन विल्यमसन. त्याने रचीन रवींद्रन सोबत डाव सावरायला सुरवात केली पण नव्हती की, शमीने रवींद्रनला बाद करुन संघाला फार मोठे यश मिळवून दिले.या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रवींद्रनने आपल्या शानदार खेळाने भल्याभल्याना प्रभावित केले आहे, पण आज मात्र महत्वाच्या सामन्यात शमीने त्याची डाळ शिजू दिली नाही.या विकेट मध्ये सुध्दा राहुलचा वाटा सिंहाचा होता. के एल राहुलने या स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणातही शानदार कामगिरी करत आपल्याला अस्सल यष्टीरक्षकाची उणीव सुद्धा भासू दिली नाही.

या आघाताने खचतील तर ते किवी खेळाडू कसले? कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल जोडीने सावधगिरी बाळगत पण खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत डाव सावरायला सुरुवात केली. बघताबघता या जोडीने आधी अर्धशतकी अन नंतर शतकी भागीदारी करत हळूहळू प्रतिकार सुरुच ठेवला. मिचेलने आजही पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचक ठरत आपले पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केले. यास्पर्धेत भारतीय गोलंदाज भल्याभल्या संघासाठी कर्दनकाळ ठरले असले तरीही एकट्या मिचेलनेच भारतीय गोलंदाजाचा समर्थ सामना करत एकमेव शतकी खेळी साखळी सामन्यात केली होती. आजही त्याने जबरदस्त मनोनिग्रहाचे प्रदर्शन करत पुन्हा एक जबरदस्त खेळी केली.

त्याला केन सुद्धा दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होता. बघताबघता त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघाला जणू धोक्याचा इशाराच दिला. अर्थात तरीही या वेळेपर्यंतही भारतीय संघच वरचढ वाटत होता. ही जोडी डोकेदुखी वाढवत होती, पण बुमराहने एका चांगल्या चेंडूवर मिचेलला जाळ्यात जवळपास अडकवलेच होते की, शमीच्या हातात आलेला झेल सुटल्याने भारतीय संघाला निराश व्हावे लागले. या जोडीने बघताबघता 150 हून अधिक धावांची नाबाद भागीदारी जोडून किवी संघ का धोकादायक मानला जातो याचे उदाहरण द्यायला सुरुवात केली होती.

मिचेलने थोड्याच वेळात आपले या विश्वकप स्पर्धेतले दुसरा शतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीने कर्णधार केन विल्यमसनला सुर्यकुमारच्या हातून झेलबाद करून आपल्या हातून झालेल्या चुकीची भरपाई तर केलीच पण संघाला मोठे यश मिळवून देतानाच ही धोकादायक ठरत असलेली भागीदारीही तोडली. केनने 73 चेंडूत 69 धावा काढल्या ज्यात 9 चौकार आणि 1 षटकात सामील होता. याच षटकात शमीने लाथमला आल्या पावली परत पाठवून किवी संघाला पुरते अडचणीत आणले.योगायोग म्हणजे न्यूझीलंड संघाच्या चारही विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज होता तो मोहम्मद शमी. यात कर्णधार रोहितचेही कौतुक करावे तितके कमीच आहे. भागीदारी फुलत असताना, गोलंदाज महागडे ठरत असतानाही त्याने संयम सोडला नाही अन योग्य वेळी शमीला पाचारण केले अन त्यानेही आपल्या कर्णधाराच्या हाकेला ओ देत आपले कर्तव्य पार पाडताना एकाच षटकात 2 गडी बाद करत संघाला मोठे यशही मिळवून दिले.

याच विकेट सोबत शमीने या वर्ल्डकप मधे सर्वाधिक 17 बळी घेतले. सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही भारतीय आणि सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही भारतीयच.यावेळी भारतीय संघ बाजी मारेल असे वाटत असतानाच ग्लेन फिलिप्सने मिचेलला शानदार साथ देत वेगवान अर्धशतकी भागीदारी जोडून आपले भगीरथ प्रयत्न चालूच ठेवले.फ़िलिप्स तर अतिशय आक्रमक अंदाजात भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला होता, एक शमी सोडला तर बाकीचे सर्व तेच गोलंदाज निस्तेज वाटत होते,ज्यांनी एकापेक्षा एक धुरंधर अशा संघाला मात दिली होती, पण अशाच बिकट प्रसंगात रोहितचे नेतृत्व जास्त कणखर होते, त्याने बुमराहला गोलंदाजीला आणले आणि बुमराहने खतरनाक फिलिप्सला जडेजाच्या हातून झेलबाद करवत संघाला योग्य वेळी यश मिळवून तर दिलेच,पण संघाला कसलेही दडपण असणार नाही असेही सिद्ध केले.

इतक्या वेळ विकेट्स मिळवण्यात अपयशी ठरलेल्या कुलदीपने आपल्या शेवटच्या षटकातल्या 5 व्या चेंडूवर चॅपमॅनला जडेजाच्या च हातून झेलबाद केले आणि वानखेडे मैदानावर एकच जल्लोष सुरू झाला.अर्थात अजूनही किवी संघ पुरता खिंडीत सापडलाय असे मुळीच नव्हते, मिचेल एक बाजूला ठाम उभा होता आणि नुसता उभाच नव्हता ,तर तो शानदार खेळत भारत आणि त्यांचा विजय यांच्या दरम्यान आडवा येत होता.

अखेर भारतीय संघाचा संकट मोचक ठरला तो मोहम्मद शमीच.त्याने एका सुंदर चेंडूवर मिचेलला जाळ्यात अडकले आणि मोठा फटका मारण्याची घाई त्याला नडली, पण तशी घाई जडेजाने अजिबात केली नाही आणि त्याने मिचेलची झुंजार खेळी समाप्त तर केलीच, पण त्याचसोबत भारतीय संघाला अहमदाबादचे तिकीटही पक्के करुन दिले. शमीने या स्पर्धेत तिसऱ्यांदा तर एकूण वर्ल्डकप मधे सर्वाधिक 4 वेळा 5 विकेट्स घेत मिशेल मार्शचा विक्रम मागे टाकला.

मिचेलने 119 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकार मारत 134 धावांची झुंजार खेळी केली, म्हणूनच तो बाद होवून तंबूत परतत असताना वानखेडेवरील दर्दी प्रेक्षकांना त्याच्या या खेळीचे टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक केल्याविना राहवलेच नाही. अशी दाद विरोधी संघाच्या खेळाडूंना केवळ भारतातच मिळते. यानंतर भारतीय संघाच्या विजयाची केवळ औपचारिकताच बाकी होती.ती मोहम्मद शमीने पुर्ण करत आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.