Vadgaon Maval : भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान शिंदे

एमपीसी न्यूज- आंबी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादितच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते भगवान कुंडलिक शिंदे आणि  उपाध्यक्षपदी गंगुबाई चिंधु दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे अध्यक्ष पिराजी वारिंगे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

अध्यासी अधिकारी म्हणून श्री लादे यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी (दि 11) सकाळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ या कार्यालयात विशेष सभा झाली. अध्यक्षपदासाठी भगवान शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी गंगुबाई दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी लादे यांनी दोन्ही उमेदवारांची निवड जाहीर केली.

याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. भगवान शिंदे हे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी कार्यवाह तर नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक असुन महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे ते संचालक आहेत. मावळ तालुक्यातील शैक्षणिक, सांप्रदायिक आणि सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत. त्यांच्या निवडीमुळे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.