Vadgaon Maval : आधार लिंक नसलेल्या कार्डधारकांनाही रेशन मिळावे : विशाल वहिले

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊन सुरु असल्याने वडगाव शहरातील व मावळ तालुक्यातील अनेक नागरिक घरी बसून कोरोना विरोधात लढा देत आहेत. यामध्ये अनेक गोरगरीब, नागरिक, मजूर, रोजंदारीवरील कामगार यांचे अन्नधान्यापासून हाल होत आहेत. सरकारकडून रेशन कार्डधारकांना धान्य उपलब्ध होऊ लागले आहे. परंतु, आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक नसल्याने त्यांना रेशनवरील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा नागरिकांनाही धान्यपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व वडगावचे माजी उपसरपंच विशाल वहिले यांनी केली आहे.

सध्या देशात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशभरात लाॅकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिक घरी आहेत. यामध्ये गोरगरिबांचे हाल होत आहेत. या कठीण काळात सरकारकडून गोरगरीब नागरिकांना रेशनवर धान्य उपलब्ध करण्यात आले आहे.

यामध्ये शासनाने रेशन दुकानांमधून पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना दोन रुपये किलो दराने तांदूळ आणि तीन रुपये किलो दराने गहू उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, याचा लाभ आधार लिंकिंग झालेल्या रेशन कार्डधारकांनाच धान्य मिळत आहे. तर आधार लिंक नसलेले रेशनकार्डधारक या धान्यापासून वंचित राहत आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीचा विचार करून आधार लिंक नसलेल्या रेशन कार्डधारकांनाही धान्य मिळावे, अशी मागणी विशाल वहिले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.