Pune : कोरोना रुग्णांसाठी ‘ससून’च्या नव्या इमारतीला महावितरणकडून 36 तासांत उच्चदाब वीजजोडणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात उभारलेल्या 11 मजली इमारतीमध्ये अवघ्या 36 तासांत नवीन उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीजयंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या इमारतीसाठी 604 केडब्ल्यू वीजभाराची नवीन उच्चदाब वीजजोडणी शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी कार्यान्वित करण्यात आली.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ससून रूग्णालयातील नवीन 11 मजली इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या इमारतीमध्ये प्राणवायू पाईपलाईन, सेक्शन काँम्प्रेसर, अद्ययावत व्हेंटीलेटर, मॉनिटर आदींसह अतिदक्षता विभाग उपचारासाठी सूसज्ज आहे. उच्चदाब वीजजोडणीसाठी वीजयंत्रणा उभारण्याचे काम नियमाप्रमाणे वीजग्राहकांना करावे लागते. मात्र, कोरोनाची आपत्कालिन परिस्थिती पाहता सर्व वीजयंत्रणा महावितरणकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे कांचन टेली इन्फ्रा इंजिनिअर्सचे विक्रम शेंडगे यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 3) सकाळी वीजयंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाला प्रारंभ झाला. यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने उच्चदाब भूमिगत वाहिन्यांचे काम करण्यात आले. सर्वांत महत्वाचे आव्हानात्मक मिटरिंग क्युबिकलचे काम वेगाने करण्यात आले. तसेच आर्थिंग, नवीन मीटर, संबंधीत विविध उपकरणे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आवश्यक पाहणी व चाचणी घेऊन सायंकाळी 5.45 वाजता ही वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

‘ससून’च्या नव्या इमारतीसाठी नवीन वीजजोडणीची तातडीची गरज पाहता महावितरणच्या अभियंत्यांनी पुढाकार घेत शुक्रवारी केवळ 8 तासांत नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण केले व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर वेगाने कार्यवाही करीत अवघ्या 36 तासांत उच्चदाबाची नवीन वीजजोडणी कार्यान्वित केली.

या कामगिरीमध्ये बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी (वाडिया उपविभाग), अनिल कुराडे (चाचणी विभाग), सहाय्यक अभियंता सिद्धार्थ सोनसळे तसेच सर्वश्री अनिल चावके, सुनील सुरनार, अजय ठाकरे या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.