Vadgaon Maval News : मोबाईल वापसीच्या मागणीसाठी मावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन दिले असून त्यातील पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडी सेविकांना दैनंदिन माहिती भरणे बंधनकारक केले आहे. माहिती न भरल्यास संबंधीत दिवसाचे मानधन दिले जात नाही. डोंगराळ भाग, इंटरनेट, वीज यांची सोय नसलेल्या गावांमध्ये काम करणाऱ्या सेविकांना यामुळे आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शासनाने दिलेले मोबाईल फोन आउटडेटेड झाले असल्यानेही त्याचा भुर्दंड सेविकांवर येत आहे. त्यामुळे शासनाने अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल वापसी करावी या मागणीसाठी मावळ तालुक्यातील सुमारे 350 अंगणवाडी सेविकांनी वडगाव मावळ येथे बुधवारी (दि. 25) आंदोलन केले.

30 मे 2019 रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात अंगणवाडी सेविकांना मोबाइल देऊन पोषण ट्रॅकर ॲपमध्ये दैनंदिन माहिती भरावी लागते. ज्या वेळेस दैनंदिन माहिती भरली जात नाही त्या वेळचे मानधन दिले जात नाही.  मावळ तालुक्यातील डोंगर  दऱ्यात असलेल्या वाड्या वस्त्यांवर लाईट नसते तर त्याठिकाणी नेटवर्क नसते. अशा परिस्थितीत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरता येत नाही.

तसेच  पॅनासोनिक कंपनीचे  मोबाईल 2019 मध्ये दिले ते आज आऊट डेटेड व नादुरुस्त झाले आहेत.  तो मोबाईल हरवल्यावर 12000 रुपये भरावे लागत आहेत. फोनची दुरुस्ती स्वतः करावी लागत आहे. कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद होत नाही.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गरोदर माता दिवस गेल्यापासून दोन वर्षे वयाचे मुल होईपर्यंत पोषण आहार तपासणी आदी कामे, कुटुंब सर्व्हेक्षण नवीन कुटुंब व स्थलांतर कुटुंब माहिती, नवीन जन्म व मृत्यु नोंद, 19 वर्ष शाळाबाह्य मुलं मुलींसाठी उपक्रम मेळावे, शून्य ते सहा वर्ष  वयांच्या मुलांना ताजा गरम आहार, टेक होम रेशन घरी लाभार्थ्यांना पोहचविणे, महिन्याच्या महिन्याला वजन, उंची लसीकरण, आरोग्य सुविधा व संदर्भ सेवा देणे,  हात धुणे सीबीई उपक्रम महिन्यातून दोन वेळा घेणे, दर महिन्याला व्हीएचएनडी उपक्रम घेणे, पूरक पोषण अभियान, आहार सप्ताह व इतर अतिरिक्त कामे असतात पण मानधन अंगणवाडी सेविकांना 8,500 तर मदतनीसला 4,500 दिले जाते.

कामाचा अतिरिक्त ताण असुन मानधन अत्यल्प दिले जात आहे. पोषण ट्रॅकर ॲपने या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा ताणतणाव वाढला आहे. शासनाने दिलेला मोबाईल परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली. शासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

जिल्हाध्यक्ष रजनी पिसाळ, राज्य महासचिव शुभा मोनिन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्य सचिव शुभा मोमीन, जिल्हाध्यक्ष रजनी पिसाळ, तालुकाध्यक्ष अनिता कुटे, सचिव अर्चना ढोरे,  फातिमा शेख, कुंदा हुलावळे, मनीषा काळे, मालती खांडभोर, मंगल कुटे, जयश्री मारणे, सुनिता जोशी, आशा शेटे, कांता चव्हाण, रेणुका जाधव, मनीषा खरात आदींसह शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

या आंदोलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष अनिता कुटे यांनी केले. आभार जयश्री मारणे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.