Pune News : पुण्यातील चार हॉटेल चालकांकडून खंडणी घेणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या उपनिरीक्षक मिलन कुरकुटेला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील मुंढवा परिसरातील चार हॉटेल चालकांकडून कारवाई करण्याची धमकी देत खंडणी घेतल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान उपनिरीक्षक कुरकुटे याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

मारुती कोंडीबा गोरे (वय 31, रा. कात्रज, पुणे) यांनी याबाबत बुधवारी (दि. 25) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 384, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरे हे मुंढवा येथील हॉटेल लोकल येथे मॅनेजर म्हणून काम करतात. हॉटेलची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा अशी आहे. त्यामुळे ते रात्री दहा नंतर कामगारांकडून हॉटेल मधील साफसफाई करून घेतात.  24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास गोरे त्यांच्या कामगारांकडून साफसफाई करून घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे अशी नेमप्लेट लावलेला पोलीस गणवेशातील एक अधिकारी कार (एम एच 33 / व्ही 1062) मधून त्यांच्या हॉटेल मध्ये आला.

एकट्याने आलेल्या कुरकुटे याने मोठमोठयाने आरडाओरडा करून मी पोलीस कमिशनर ऑफिसमधून आलो आहे, असे सांगून फिर्यादी यांच्या हॉटेलवर आणि अन्य हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दोन हजार रुपयांची खंडणी घेतली.

त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्ज मध्ये जाऊन मॅनेजर साहील पित्रे यांनाही कारवाईची धमकी देत त्यांच्याकडून दोन हजार रुपये खंडणीस्वरुपात घेतले. हॉटेल कॉर्निव्हलचे मॅनेजर किशोर छोटुमल थापा यांनाही धमकी देऊन त्यांच्याकडून देखील तीन हजार रुपये खंडणीस्वरुपात घेतले.

चार हॉटेल मधून कुरकुटे याने सात हजारांची खंडणी घेतली. तसेच हॉटेल मेट्रो व हॉटेल धमाका येथे जाऊन हॉटेल चालकांना खंडणीसाठी धमकावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्यादी यांनी मुंढवा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास या घटनेची माहिती दिली. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणा-या अशोभनीय कृत्याबद्दल कुरकुटे याचे त्वरित प्रभावाने निलंबन करण्यात आले आहे. मुंढवा पोलिसांनी कुरकुटे याला अटकही केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एच एस गीरी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.