Vadgaon News : ‘नगरसेवक शोधा, बक्षिस मिळवा’ ; नगरसेवक केंगले यांच्या राजीनाम्याची मागणी

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक एकच्या त्रस्त नागरिकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक दशरथ केंगले यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या नागरिकांनी “नगरसेवक शोधा, बक्षिस मिळवा” असे निषेध फलक प्रभागात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. सध्या हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, नगरसेवक केंगले यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे सांगून नगरसेवक केंगले गायब झाले. मात्र, ते स्वतःचे नगरसेवकपद वाचवण्यासाठी नगरपंचायतमध्ये होणार्‍या सर्वसाधारण सभेस फक्त हजेरी लावतात आणि निघून जातात.

प्रभागातील नागरिकांचे फोन न उचलणे, चुकून उचलला तर उद्धटपणे बोलणे, ‘मी राजीनामा दिला आहे मला फोन करू नका’,अशी उडवाउडवीची उत्तरे देणे यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक केंगले यांच्या निषेधाचे फलक लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नगरसेवक केंगले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही संतप्त रहिवाशांनी केली आहे. आम्हाला प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

दरम्यान, वडगाव मावळ नगरपंचायतीमध्ये भाजपाचा एक नगरसेवक गेल्या एक वर्षापासून सभेला उपस्थित राहत नाही. त्यामुळे या नगरसेवकाला शोधा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केले आहे.

सत्ताधारी नगरसेवकांवर भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपाचे खंडन करीत या आरोपात काहीच तथ्य नसल्याचेही या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या संदर्भात नगरसेवक केंगले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.