Vadgaon News : गायरान जमिनीवरील आरक्षणास कातवी ग्रामस्थांचा विरोध

ग्रामस्थांचे मुख्याधिकारी, तहसीलदार व आमदारांना निवेदन

0
एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत हद्दीतील कातवी गावच्या गायरान जमिनीचे ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर हस्तांतरण अथवा आरक्षण करण्याचा प्रयत्न नगरपंचायतकडून सुरू असून त्यास ग्रामस्थांकडून  तीव्र विरोध करण्यात आला आहे.
याबाबत, दत्तात्रय पिंपळे, रवींद्र चव्हाण, किशोर चव्हाण, वैभव पिंपळे, मारुती चव्हाण, अंकुश चव्हाण, शैलेश चव्हाण, अजिंक्य चव्हाण,दिनेश चव्हाण, शिवाजी चव्हाण आदींनी काल मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, मावळचे आमदार सुनील शेळके  आदींकडे  लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कातवी गावच्या हद्दीतील गायरान जमीन गट क्र.११९ व ११५ या जमिनीची मोजणी ठेवण्यात आली होती, त्यावेळी ग्रामस्थही उपस्थिती होते, परंतु त्यावेळी ग्रामस्थांना डावलून मोजणी करण्यात आली, त्यामुळे सदरची मोजणी ही बेकायदेशीर आहे.
सदरची गायरान जमीन गावच्या विकासासाठी व विस्ताराच्या दृष्टीने महत्वाची आहे, त्यामुळे या जमिनीवर कुठल्याही प्रकारचे आरक्षण करु नये असे निवेदन याआधी देण्यात आले होते. परंतु नगरपंचायतने मात्र ग्रामस्थांच्या निवेदनाचा विचार न करता परस्पर मोजणी करून आरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता गायरान जमिनीवर कुठलेही आरक्षण करू नये, अथवा कचरा डेपो करू नये अशी मागणी करण्यात आली असून ग्रामस्थांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. वेळप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, यापूर्वी ग्रामपंचायत असतानाही कातवी गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात होते, आता नगरपंचायत होऊन दोन वर्षे झाली तरी कातवी गावामध्ये एकही विकासात्मक काम झालेले नाही अथवा कोणत्याही कामास मंजुरी मिळत नाही असाही आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
 बहुमताच्या जोरावर घेतलेल्या ठरावाला स्थगिती द्यावी
वडगाव कातवी नगरपंचायतची नव्याने स्थापना होऊन दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. वडगांव नगरपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 2  भागामध्ये कातवी गावचा समावेश होतो.
 तेथे आजपर्यंत कोणत्याही सोयी सुविधां राबवण्यात आलेल्या नाही नगरसेवक म्हणुन वारंवार निवेदन देऊन विकासकामे असतील तसेच इतर लहान तक्रारी असतील त्याची देखील कोणतीही दखल नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी पक्षाकडून घेण्यात आलेली नाही.
कातवी गावाला लागूनच गायरान क्षेत्र आहे ती जागा परस्पर वनीकरण विभागास देऊन वनीकरण विभागाची जागा ही कच-यासाठी  कायमस्वरुपी करुन घेण्याचा घाट नगरपंचायतीने घातला आहे. यामध्ये वडगाव नगरपंचायत प्रशासन,नगराध्यक्ष यांनी याबाबत संबंधित प्रभागांचे नगरसेवक व स्थानिक नागरीक यांना कोणत्याही प्रकारची माहीती न देता  दि १८ सप्टेंबरच्या ऑनलाईन मिटींगमध्ये हा विषय घेतला आहे. सत्तेचा वापर करून बहुमताच्या जोरावर नको ते ठराव करून जनतेची फसवणूक केली जात आहे. याविषयाला स्थगिती द्यावी.
 मी त्या प्रभागात नगरसेवक म्हणुन निर्णयाच्या विरोधात समस्त कातवी ग्रामस्थांच्या बाजुने खंबीरपणाने उभा राहणार आहे.  नगरपंचायतच्या या निर्णयाच्या विरोधात आहे. कातवी गावात पाठपुरावा करुन देखील कच-याची गाडी देखील तेथे वेळेवर जात नाही. गावाचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही गावासाठी स्मशानभुमी देखील नाही अशा अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न नगरपंचायतने करावा तसेच गायरान जागा ताब्यात घेण्याच्या विषयाला स्थगिती द्यावी
– दिनेश गोविंदराव ढोरे 
नगरसेवक प्रभाग क्रमांक २, गटनेते भाजपा.
कचऱ्यासाठी पर्यायी जागेचा विचार करावा.
कातवी गावामध्ये 40 वर्षापूर्वी  20  घरे होती आता ती 100 झाली आहे. लोकसंख्याही वाढलेली आहे. औद्योगिककरणामुळे गावच्या विस्तार व विकासासाठी गायराना व्यतिरिक्त कातवी गावाला दुसरी जागाच नाही.
त्यात नगरपंचायत प्रशासनाकडून गावाक-यांना विश्वासात न घेता कचरा डेपोसाठी गायरानावर आरक्षण करण्याचा घाट घातला आहे. कचऱ्यासाठी पर्यायी जागेचा विचार करावा. गायरानावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण लादू नये. त्या आरक्षणाला स्थगिती द्यावी,  अन्यथा आपल्या विरोधात जनक्षोभ उसळेल.
– वैभव पिंपळे, मावळ तालुका  राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष.

कातवीगावामध्ये मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा  निधी वा विकासकामे झालेली नाहीत. कातवी गावाचा वडगाव सारख्या नगरपंचायतीत समावेश “असूनही  अडचण नसून खोळंबा” अशी अवस्था झालेली आहे.
 गावांमध्ये डांबरीकरण रस्ता असताना  टाटा हाऊसिंग सोसायटीच्या (वडगाव)  फायद्यासाठी गावचा रोड खराब करून पाईपलाईनचे काम केले गेले. आजपर्यंत सदर रस्ताही करून दिला नाही,  कित्येक वर्षे गावच्या पाईपलाईन फिल्टरचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गावांमधील शेतक-यांनी स्मशानभूमीसाठी जागा देऊन ही  स्मशानभूमी बांधली गेली नाही. लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत अन्यथा जनआंदोलन  केले जाईल.
– दत्तात्रय सिताराम पिंपळे, सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.