Vadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि. 25) आंदरमावळातील बेलज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

मावळातील आदिवासी बांधवांच्या मागील अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आदिवासी समाजाच्या विविध समस्या व मागण्यांवर आदिवासी बांधव व प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामध्ये आदिवासी मुलामुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वसतीगृह बांधणे ,सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यात आदिवासी सांस्कृतिक भवन बांधणे, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, वडेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळेचे नूतनीकरण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच मावळातील आदिवासी गावांसाठी पेसा कायदा लागू करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

‘आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर मूलभूत सोयीसुविधा सुधारल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आदिवासी बांधवांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य या सुविधांबाबत शासन संवेदनशील असून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आदिवासी विभाग यांच्याकडे पाठपुरावा करु, गरज पडल्यास विधानसभेत आपल्या समस्या मांडू असा विश्वास यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी आदिवासी बांधवाना दिला.

यावेळी बिरसा ब्रिगेड मावळ, बिरसा क्रांती दल मावळ, आदिवासी विचार मंच, या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शंकरभाऊ बोऱ्हाडे, गणेश वाघमारे, जयदास सुपे, योगेश मदगे, अंकुश चिमटे, राघोजी तळपे, शिवाजी कशाळे, किरण हेमाडे, विशाल झडे, कैलास करवंदे, लक्ष्मण केंगले, उमाकांत मदगे, सुरेश बगाड, शंकर हेमाडे, दिलीप बगाड, रोहन मदगे, मंगेश लांघी, चिमाजी कोकाटे , बाजीराव सुपे, बाबुराव वाजे, ज्ञानेश्वर कोकाटे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.