Maval : विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाखांची नुकसानभरपाई

एमपीसी न्यूज – शिरगाव येथे विजेचा धक्का (Maval) लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.दीड वर्षानंतर महावितरणकडून मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी महावितरणकडे पाठपुरावा केला मात्र त्यांना महावितरणकडून प्रतिसाद मिळाला नाही.आमदार सुनील शेळके यांनी आमसभेत मयत शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी केली असता महावितरणने याची तात्काळ दखल घेत नुकसानभरपाई जमा केली आहे.

बुधवार 17ऑगस्ट 2022 रोजी शिरगाव येथे राहणारे राजाराम वामन गोपाळे (वय 65) हे संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता महावितरणच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श त्यांच्या पायाला झाला. व जोरात विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले.शेतातून बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी सुमन या शेतात शोधण्यास गेल्या असता त्यांना ते चिखलात पडल्याचे दिसले.

त्यामुळे जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता सुमन यांना देखील विजेचा धक्का बसला व त्या जोरात ओरडल्या.हा आवाज ऐकून बाजूला असलेले बापू गोपाळे धावून आले व त्यांच्या लक्षात आले की दोघांनाही विजेचा धक्का बसला आहे.त्यामुळे त्यांनी हातात बूट घालून सुमन यांना बाजूला केले.बेशुद्ध अवस्थेत असलेले राजाराम गोपाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Mumbai : 20 वर्षांपासून फरार असलेला मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारी चीनमधून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याला (Maval) जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.गोपाळे यांच्या कुटुंबियांना महावितरणकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत होती.परंतु दिड वर्ष महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुन देखील त्यांची दखल घेतली जात नव्हती. अखेर 15 फेब्रुवारी 3024 रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेमध्ये मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी मदत करण्याची मागणी केली होती.आमदार सुनिल शेळके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना दिल्या होत्या.

शुक्रवार 22 मार्च 2024 रोजी महावितरणने सुमन गोपाळे यांच्या खात्यामध्ये चार लाख रुपये वर्ग करुन नुकसान भरपाई अदा केल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.