Vikasnagar News : कौतुकास्पद ! चिमुकलीचे खाऊच्या पैशातून मोफत मास्क वाटप

एमपीसीन्यूज : किवळे- विकासनगर येथील नुपूर मयूर पांडे या चिमुकलीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खाऊच्या पैशातून विकासनगर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क वाटप केले. तसेच प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही या चिमुकलीने केले.

नुपूर पांडे या 13  वर्षीय चिमुकलीने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. नुपूर ही देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामध्ये विकासनगरचा समावेश असलेल्या ‘ब’ प्रभाग हद्दीतही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नुपूर हिने समाजभान राखून आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊच्या पैशातून मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतल. त्यानुसार तिने विकासनगर येथे विनामास्क फिरणारी बालके, नागरिक आणि महिलांना मोफत मास्क वाटप केले. खाऊच्या पैशातून जवळपास 1200 रुपये जमा झाले होते. त्यातून शंबर मास्क वस्ताप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अलका पांडे, शामल थोरी, समृद्धी पंडित, सीमा राजपूत, रुद्र कणेरे, मुस्कान शेख, आदिरा पिल्ले, ललित पांडे, पल्लवी पांडे, स्नेहल पांडे, मधुरा पंडित, अरुणा चव्हाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, एका मास्कची खरी किंमत नूपुरला समजली. कोरोना प्रतिबंधासाठी तिने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहेच शिवाय कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे, अशा शब्दांत शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी यांनी या चिमुकलीचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.