Balewadi : पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 तर चिंचवडची 22 टेबलांवरुन होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील ईव्हीएम (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून उद्या (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. पिंपरी, भोसरी मतदारसंघाची 20 आणि चिंचवडची 22 टेबलांवरुन मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असणार आहेत. तीनही मतदारसंघातील मतमोजणी कर्मचा-यांना आज (बुधवारी) प्रशिक्षण देण्यात आले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 20 टेबल असणार आहेत.  रिडर, राईटर, निरीक्षक आणि मदतनीस असे चार कर्मचारी एका टेबलवर कार्यरत असणार आहेत. ईव्हीएम ने-आण करण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक कर्मचारी,  नियंत्रण ठेवण्यासाठी पाच अधिकारी,  ईव्हीएम देण्यासाठी आणि परत जागेवर ठेवण्यासाठी दहा कर्मचारी आणि नियंत्रणासाठी दोन नोडल अधिकारी, संगणक ऑपरेटर 20, नोडल अधिकारी, लिपिक, शिपाई असे कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत असणार आहेत. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. सव्वाआठच्या सुमारास पहिला फेरी सुरु होईल आहे, असे निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले.

चिंचवड मतदारसंघ राज्यातील दुस-या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी 22 टेबलांवरुन होणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवक्षेक, एक सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक कार्यरत असणार आहेत. पोस्टल मतांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. मदतनीस, शिपाई कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात असणार आहेत.

भोसरी मतदारसंघातील ईव्हीएमची मतमोजणी 20 टेबलांवरुन तर पोस्टलची मतमोजणी तीन टेबलवरुन होणार आहे. 20 टेबलकरिता 40 मतमोजणी पर्यवक्षेक कार्यरत असणार आहेत. पोस्टल बॅलेटसाठी तीन असे  नऊ कर्मचारी आणि इतर कामासाठी 30 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. एकूण सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत आहे. मतमोजणीच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.