Wakad Crime News : ‘लॉकडाऊन’मुळे कंटाळून ‘एमपी’तील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले पुणे! पुढं काय घडलं वाचा…

सतर्क तरुण आणि पोलिसांच्या मदतीने मुलगी सुखरूप नातेवाईकांकडे पोहोचली 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडले अन थेट पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर आई-वडिलांची आठवण होऊ लागल्याने मुलगी घाबरली. दरम्यान तिने एक मोबाईल फोन देखील खरेदी केला. सतर्क तरुणाने मुलीला पाहिले आणि पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तीन तासात मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

रविवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजता सोपान किसनराव पौळ (वय 21, रा. काळाखडक, वाकड) या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला वाकड पोलीस ठाण्यात आणले. ती मुलगी हरवली असून तिला तिच्या आई-वडिलांकडे जायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मुलगी देखील अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. ती एकसारखी रडून ‘मला आई-वडिलांकडे सोडा’ असे म्हणत होती. पोलिसांनी तिला शांत केले आणि विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली.

ती मुलगी मध्य प्रदेश मधील खंडवा येथील असल्याचे तिने सांगितले. ‘लॉकडाऊनमध्ये घरातच थांबवे लागले होते, त्यामुळे घरामध्ये बसुन वैताग आला होता. म्हणून मी घरामध्ये कोणास काही न सांगता फिरण्यासाठी घरामधून पाच हजार रुपये गुपचुप घेऊन एकटीच 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता बसने पुण्याला आले. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यात उतरले’ असे मुलीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तिच्याकडे आणखी चौकशी करून तिच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्याच्याशी संपर्क केला. दरम्यान मुलीचे आई, वडील आणि भाऊ खंडवा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्याचे वाकड पोलिसांना समजले.

वाकड पोलिसांनी खंडवा पोलिसांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. खंडवा येथून तात्काळ पुण्याला येणे शक्य नसल्याने मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवले.

पुण्यातील नातेवाईकांची ओळख पटवून वाकड पोलिसांनी मुलीला त्यांच्याकडे सुखरूपपणे सुपूर्द केले. दरम्यान मुलीने एक मोबाईल फोन घेतला होता. मोबाईल दुकानदाराची माहिती काढून मोबाईल परत करून मुलीला तिचे पैसेही पोलिसांनी परत मिळवून दिले. ही कामगिरी वाकड पोलिसांनी केवळ तीन तासात केली.

ही कामगिरी पोलीस उप निरीक्षक विकास मडके, पोलीस हवालदार जगताप, पोलीस शिपाई तोडकर, महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी पथकाचे कौतुक केले. तर अल्पवयीन मुलीचे वडील व भाऊ यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.