Wakad : वाढत्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विशाल वाकडकर

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश येत असून लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले आहे. यावर अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही, अशा संवेदनाहिन मुख्यमंत्र्यांनी शहरातील व राज्यातील महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या चार घटना घडल्या व एका पिडीत मुलीचा खून करण्यात आला. ऑगस्टमध्ये पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. तरीदेखील शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांना अद्यापही नियंत्रण मिळविता आले नाही. उलट गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे शहरातील युवती, महिला मानसिक दडपणाखाली जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

पोलीस, राजकारणी आणि गुंडांचे हितसंबंध असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. तडीपार गुंडदेखील दिवसाढवळया शहरात वावरून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत आहेत. यामुळे शहराच्या सुरक्षेला बाधा पोहचत आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून कासारसाई (हिंजवडी), पिंपरी आणि चिंचवड येथील पिडीत कुटुंबियांना भेटण्यास मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना वेळ नाही ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका वाकडकर यांनी केली आहे.

या घटनेवर अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही, अशा संवेदनाहिन मुख्यमंत्र्यांनी शहरातील व राज्यातील महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वाकडकर यांनी केली आहे.

शहरातील गुन्हेगारी, बेकायदेशीर धंदे, दुचाकी वाहने तोडफोड व जाळण्याच्या घटना, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या घटना यामध्ये वाढ होत आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला व अमिषाला बळी पडू नये, तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करून गुन्हेगारांवर जरब बसवावी, अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.