Wakad : पत्रकार संतलाल यादव यांच्या घरावर हल्लाप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्रकार संतलाल यादव यांच्या घरावर अकरा जणांनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.

संतलाल रोशनलाल यादव (वय 48, रा. सहकार कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश नढे, नवनाथ नढे, किरण नढे, किरणचे वडील आणि अन्य सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतलाल यांच्या हर्षद (वय 16) आणि प्रतीक (वय 18) यांचे भारत माता चौक येथे आरोपींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दोन्ही मुले घरी आली. त्यानंतर, या भांडणाच्या रागातून सर्व आरोपी यादव यांच्या घरी आले. जबरदस्तीने घरात घुसून मुलांना हाताने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या भांडणात दोन्ही मुले जखमी झाली.

त्यानंतर आरोपींनी संतलाल यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार चुकवून संतलाल यांनी दरवाजा बंद करून घेतला असता आरोपींनी घरावर दगडफेक केली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पळून गेले. या प्रकरणात प्रतीक यादव याचा मोबाईल फोन गहाळ झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.