Wanwadi Firing Case: वानवडी गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराने घेतली होती 30 लाखांची सुपारी

खुनाची सुपारी देणाऱ्या बाळासाहेब जाधव याला अटक

एमपीसी न्यूज – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 सप्टेंबर रोजी मयूर हांडे या वाळू व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने 30 लाखांची सुपारी घेतली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 सप्टेंबरला झालेल्या गोळीबारात मयूर हांडे हा वाळू व्यावसायिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी राजेश भिकू पडवळ (वय 25) या हल्लेखोराला अटकही केली आहे. मयुर हांडे यांना मारण्यासाठी हल्लेखोराने 30 लाख रुपयांची सुपारी घेतली होती, अशी नवी माहिती या प्रकरणी समोर आली आहे.

वानवडी पोलिसांनी याप्रकरणी बाळासाहेब अनंत जाधव (वय 52) या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी मयूर हांडे यांच्या वागणुकीचा त्रास होत असल्यामुळे जाधव यांनी राजेश पडवळाला सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

फिर्यादी मयुर हांडे वाळू व्यावसायिक आहेत. 12 सप्टेंबर रोजी ते वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात थांबले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला होता. या घटनेत हांडे यांच्या गालाला गोळी लागून गेल्याने ते जखमी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.