Pimpri : वारक-यांनी दिली महेश लांडगे यांच्या कामाची पावती

आळंदी-दिघी पालखीमार्ग रुंद झाल्याने पालखीचे विनाअडथळा प्रस्थान 
 
एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने आज (शुक्रवारी) आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सारथ्य करत पालखी आणि पालखीसोबत आलेल्या लाखो वारक-यांचे भोसरीत स्वागत केले. दरम्यान, आमदार लांडगे यांनी पालखी मार्गावर केलेल्या कामाची पावती खुद्द वारक-यांनी दिली. स्वच्छता, रुंद रस्ता, भेटवस्तू आणि चोख व्यवस्था यामुळे विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी भारावून गेले. 
 

पूर्वी आळंदी ते विश्रांतवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत असत. त्यात आषाढी वारीच्या वेळी तर वारक-यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत असे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे आळंदी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. आता वारकरी आनंदाने या मार्गावरून पंढरीच्या दिशेने कूच करतात. पालखी मार्ग वेगळा करण्यात आला असल्याने वाहतुकीची देखील समस्या उरली नाही. 
 
लातूरवरून आलेल्या एक वारकरी महिला म्हणाल्या, मागील ब-याच वर्षांपासून आम्ही पालखीत येतो. काही वर्षांपूर्वी आळंदीहून निघाल्यानंतर दिघीजवळच्या भागात आम्हाला खूप त्रास व्हायचा. रस्ता अरुंद होता. त्यामुळे रस्त्याने व्यवस्थित चालता येत नसे. मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होत असे. कित्येक महिला वारकरी या मार्गावर गर्दीमुळे अडखळून पडल्या आहेत. आम्ही या मार्गावर वर्षातून एकदाच येतो. आमची अडचण समजून घेत हा रस्ता चांगला केला आहे. यामुळे पूर्वी येणा-या अडचणी आता येत नाहीत. आता आम्ही आनंदाने विठ्ठलाच्या भेटीला निघालो आहोत. असे म्हणत त्या महिलेने रस्ता करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांना आशीर्वाद देखील दिले. 
 
रस्त्याविषयी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2013 साली स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पिंपरी-चिंचवडकरांची सेवा करत असताना आळंदी-विश्रांतवाडी या मार्गाचा निर्णय घेतला. तो निर्णय पूर्णत्वास आणण्यासाठी वारंवार त्याचा पाठपुरावा केला. पाठपुराव्याला महापालिका प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य करत, हा मार्ग पूर्ण केला. हा रस्ता रुंद झाल्याने पालखीला अडथळा येत नाही. पालखीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग करण्यात आला असल्याने गर्दीला आळा बसला आहे. आळंदीहून पंढरपूरला जाणा-या प्रत्येक वारक-यात मला माझा पांडुरंग दिसतो. त्यामुळे वारक-यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, असे मानून हे काम करण्यात आले. यापुढे पुणे-नाशिक रस्त्यासाठी प्रयत्न करणार आहे. वारंवार पाठपुरावा करून तो मार्ग देखील येत्या काही काळात पूर्णत्वास नेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.