Municipal Corporation :  महापालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटसॲप- चॅट बॉट प्रणाली!

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत  (Municipal Corporation) नागरिकांकरीता व्हॉटसॲप– चॅट बॉट प्रणालीचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  शहरवासीयांना आता घरबसल्या वापरता येणा-या या सुविधेकरीता महापालिकेमार्फत 8888006666 हा मोबाईल क्रमांक  प्रसारित केलेला असून नागरिकांना स्वत:च्या मोबाईलमध्ये तो समाविष्ट करावा लागणार आहे.  

आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, सह शहर अभियंता रामदास तांबे, अशोक भालकर, श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, अजय चारठाणकर, सुभाष इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत (Municipal Corporation)  अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य पध्दतीने उपयोग करून नागरिकांना वेळोवेळी उत्तमोत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये महापालिकेचे अद्ययावत  संकेतस्थळ,  स्मार्ट सारथी ॲप आणि सारथी हेल्पलाईन इत्यादींचा समावेश होतो. आता पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हाटसॲप- चॅट बॉट प्रणाली सुरु करण्यात आली आहे. याचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने  सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

8888006666 हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईल समाविष्ट केल्यानंतर व्हाटसॲपद्वारे नागरिकांना चॅट बॉट प्रणालीचा वापर करता येणार आहे.  समाविष्ठ केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे व्हाटसॲपद्वारे मेनू असे टाईप केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या सोईनुसार भाषा निवडण्याकरीता मराठी अथवा इंग्रजी असे दोन भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. भाषेचा पर्याय निवडल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक सत्यापित (व्हेरीफाय)  करण्यासाठी आपले नांव सदर ठिकाणी नमुद करणे आवश्यक आहे.  आपले नांव सत्यापित झाल्यानंतर आपणास आपली तक्रार नोंदविण्याकरीता सदर पर्याय उपलब्ध होणार आहेत.  सद्यस्थितीत महापालिकेमार्फत प्रायोगिक तत्वावर आरोग्य विभागा संदर्भातील सेवा सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या असून लवकरच महापालिकेच्या इतर विविध विभागांच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे.

Pune Crime News : लग्नासाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीचा गळा चिरला

 

व्हॉटस् ॲप- चॅट बॉटप्रणालीद्वारे नागरिकांना कचरा उचलणारे वाहन आले नाही या बाबतच्या तक्रारी, महापालिका संदर्भातील तक्रारी, सार्वजनिक शौचालया विषयक तक्रारी, मृत जनावरांबाबतच्या तक्रारी, परिसर रस्ता झाडलोड न झाल्याबाबतच्या तक्रारी, सांडपाणी रस्त्यावर वाहत असलेबाबतच्या तक्रारी, बांधकाम राडारोड उचलणेबाबतच्या तक्रारी, सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून असणे अथवा कचरा जाळण्याबाबतच्या तक्रारी अशा प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे.  त्याचप्रमाणे नागरिकांना आपण केलेल्या तक्रारी बाबतची सद्यस्थिती देखील उपलब्ध होणार आहे.

आभासी सहाय्यक चॅट बॉट या नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे.   नागरिकांमार्फत विचारण्यात येणा-या प्रश्नांवर संगणक प्रणालीद्वारे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येवून प्रश्न आत्मसात करुन त्यानंतर नागरिकांना योग्य ते उत्तर आभासी सहाय्यका चॅट बॉट मार्फत प्राप्त होणार आहे. आभासी सहाय्यक चॅट बॉट प्रणालीद्वारे विविध तक्रारींचे निराकरण नागरिकांना आभासी सहाय्यकाद्वारे चॅट बॉट प्राप्त होणार आहेत. या  प्रणालीद्वारे नागरिकांना दैनंदिन भेडसावणा-या विविध समस्यांचे निराकरण आभासी सहाय्यकाद्वारे चॅट बॉट सहज शक्य होणार आहे.

“नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील संवाद साधण्याचा जलद दुवा म्हणून ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे.  सहज सुलभ संवादाचे माध्यम महापालिकेने उपलब्ध करुन दिले असून शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त चॅट बॉट प्रणालीचा  वापर करावा” असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.