Pimpri : लोकसभेला शिरुरमधून आढळराव तर मावळातून बारणे यांना प्रतिस्पर्धी कोण?

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीला जेमतेम आठ ते नऊ महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. त्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिलेल्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली असून उमेदवार निश्चित केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारीसाठी ‘ग्रीन’ सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आढळराव आणि बारणे यांच्यासमोर राष्ट्रवादी आणि भाजकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे सर्वच निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासूनच निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. त्यानुसार सत्तेत एकत्र असलेली भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. शिरुर आणि मावळातील आपल्या खासदारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाल्याचे नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले आहे.

शिरुर मतदार संघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव खासदार असून त्यांची ही तिसरी टर्म आहे. आता चौथी निवडणूक लढविण्यास ते सज्ज झाले आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन खेडचे खासदार अशोक मोहळ, माजी आमदार विलास लांडे, आंबेगावचे देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये भोसरी, खेड, शिरुर, जुन्नर, हडपसर, आंबेगाव या विधानसभा मतदार संघांचा समोवश आहे. यापैकी केवळ खेड विधानसभेत शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून लोकसभेसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नव्हे तर लांडगे यांच्याएवढा तुल्यबळ उमेदवार शिरूरमध्ये भाजपकडे आजच्या घडीला नाही. त्यामुळे युती नाही झाली. तर भाजपचे उमेदवार महेश लांडगे हेच असण्याची दाट शक्यता आहे. तर,  राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे यंदा लोकसभा लढविण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी दरवेळी प्रमाणे ऐनवेळी नकार दिल्यास खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात. शिरुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने आढळराव यांच्यासाठी निवडणूक कठिण जाण्याची चिन्हे आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघ सलग दुस-यावेळी शिवसेनेकडे आहे. आता हॅटट्रिक मारण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना पक्षप्रमुखांनी केल्या आहेत. तसेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला ‘ग्रीन’ सिग्नल देखील दिला आहे. 2009 साली शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा पराभव केला होता. तर, 2014 साली श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर, शेकाप, मनसे अपक्षांच्या पाठिब्यांवर निवडणूक लढलेले लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता.

मावळ लोकसभा मतदार संघ हा मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघाचा भाग नवी मुंबईपर्यंत येतो. या मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत-खालापूर यामध्ये तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर, दोन मतदार संघात शिवसेनेचे आणि एका मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. भाजपकडून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर, ऐनवेळी मावळचे आमदार बाळा भेगडे यांना देखील उमेदवारी मिळू शकते. तर, राष्ट्रवादीकडून माजी महापौर संजोग वाघेरे तीव्र इच्छूक आहेत. तसेच गेल्या निवडणुकीला घाटा खालचा उमेदवार दिल्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातीलच उमेदवार देण्याची मागणी केली जात आहे. परंतु, पक्षाने अद्याप आपले पत्ते खोलले नाहीत. त्यामुळे बारणे यांच्या विरोधात भाजप  आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू   लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.