Navlakh Umbare News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने वाचविले डोंगरावरून घसरलेल्या तरुणाचे प्राण

एमपीसी न्यूज – वन्यजीव रक्षक मावळ संस्था व ग्रामस्त यांच्या मदतीने नवलाख उंबरे एमआयडीसीजवळील नानोली तर्फे चाकण येथील फिरंगाई डोंगरावरून पाय घसरून पडलेल्या एका जखमी तरुणाचे वाचले प्राण वाचविण्यात यश आले आहे.जखमी तरुणाचे नाव युदाजित  चक्रबोरती (वय 19)  असे असून तो मूळचा कोलकाता येथील आहे.  

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना 21 ऑगस्टच्या संध्याकाळी 7.30 वा कळाले की,फिरंगाई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला ग्रुपमधील एक तरुण पाय घसरून पडून गंभीर जखमी झाला आहे.तो मावळमधील इंदोरी येथील तोलानीचा विद्यार्थी आहे.

क्षणाचाही विलंब न लावता वन्यजीव रक्षक मावळ आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, भास्कर माळी, सत्यम सावंत, अविनाश कारले, रौनक खरे, विक्रांत अग्रवाल व इतर सदस्य वनरक्षक घटनास्थळी पोहोचले.मंगल ढोरे व ग्रामस्त हे सर्व घटनास्थळी आपले साहित्य घेऊन रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदर व्यक्तीची परिस्थिती पहिली. तो पाय घसरून कातळ खडकावर पडून घसरत गेल्याने त्याच्या हातांवर व डोक्यावर जखमा झाल्या होत्या.त्याच्या हाताची नखे कापली गेल्याने रक्तसराव होत होता.घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्यास प्रथम उपचार करुन स्ट्रेचरवरून तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर पायथ्याला आणले.

पाऊस आणि काळोख असल्याने चालताना अडचणी येत होत्या. युदाजित याच्या डोक्याला तसेच दोन्ही हातांना गंभीर इजा झाली होती आणि खूप रक्तस्त्राव झाला होता, अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्यास हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे आव्हान टीम समोर होते. या सर्व परिस्थितीवर मात करत रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्याला डोंगराच्या पायथ्याला व पायथ्या पासुन रोडपर्यंतचा प्रवास चिखल, चढउतार करत गवतातून, मार्ग काढत ॲम्बुलन्सपर्यंत पोहोचले आणि तात्काळ सोमाटणे फाट्याजवळील पवना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.