Pimpri : यशवंतराव चव्हाण मराठी मनांचा मानबिंदू – राजेंद्र पाटील

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे मराठी मनांचा मानबिंदू संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, राज्यात सहकार क्षेत्राची पायीभरणी करणारे नेते म्हणून अवघा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्याकडे बघतो, अशा या द्रष्ट्या नेत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांनी समाजकारण व राजकारणात पुढे यायला हवे, असे आवाहन मार्गदर्शन राजेंद्र पाटील यांनी भोसरी येथे केले.

भोसरीतील कै. पै. धोंडीबा उर्फ गणपत फुगे (पाटील) क्रीडा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण उत्तुंग व्यक्तिमत्व’ या विषयावर व्याख्यान देताना पाटील बोलत होते. या महोत्सवाचे आयोजन युवानेते अमर फुगे यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव कदम, पिंपरी-चिंचवड सेवानिवृत्त संघटनेचे विलास देसाई, दादाराव सोनवणे, शांताराम वाळुंज, हनुमंत पोखरकर, वसंत जाचक, आप्पा घुले, शंकर मुळे, पंढरीनाथ गोरडे, धनंजय गोरे, अशोक हुंबे, अनिल हुंबे, बाळासाहेब लाकाळ, आत्माराम लाकाळ, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांचा जन्म क-हाड तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात 12 मार्च 1913 ला कराड तालुक्यात झाला. तर 25 नोव्हेंबर 1984 ला त्यांचे निधन झाले. 71 वर्षांच्या त्यांच्या कार्यकीर्दीत त्यांनी समाजकारण, राजकारण, शेती, सहकार, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव पुढे आणले. तीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेल्या यशवंतरावांना राजकीय जीवनात अवघड परिस्थितीशी मुकाबला करावा लागला.

प्रशासनावर त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. देशातील सरकारपूढे ज्वलंत परिस्थिती उभी राहावी आणि ती शमवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडावी, असे अनेकदा घडले. बांगलादेशच्या युध्दामुळे निर्माण झालेल्या अवघड आर्थिक परिस्थितीत देशाचे अर्थमंत्रिपद त्यांना सांभाळावे लागले. 1962 च्या चीन युद्धाच्यावेळी त्यांनी पुण्यात शनिवारवाडा येथे घेतलेल्या सभेत नागरिकांना देशसेवेसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यावेळी पुण्यातील नागरिकांनी लाखो रुपयांचा निधी व पाच पोत्यांपेक्षा जास्त सोने देशासाठी दान दिले होते.

मुंबई राज्यातील दोन प्रमुख भाषिकांत विश्र्वास निर्माण करणे. सैन्यदल व उच्च अधिका-यांचे मनोधैर्य वाढवणे आणि संसदीय कार्यपद्धतीस निर्माण होणारा धोका टाळणे, ही मोठी जबाबदारी यशवंतरावांनी पेलली. हे पंतपधान नेहरू यांनी पाहिले. मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे ही यशवंतराव चव्हाण यांची आग्रही भूमिका पंतप्रधान पंडीत नेहरू यांना मान्य करावी लागली; महाराष्ट्र कलश महाराष्ट्रात आणण्याचे काम यशवंतराव यांनी केले. महाराष्ट्राच्या औद्यागिक सहकार क्षेत्राच्या पायाभरणीचे श्रेय यशवंतरावांनाच द्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले.
स्वागत अमर फुगे, सुत्रसंचालन शंकर मुळे आणि आभार परशुराम फुगे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.