Pimpri: बोपखेल-आळंदी बीआरटी मार्गावर 10 बसथांबे उभारणार; आठ कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या बोपखेल ते आळंदी बीआरटी मार्गावर दहा बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 8 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये स्वयंचलित दरवाजे, दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

आळंदी ते पंढरपूर हा पालखी महामार्ग म्हनून राज्य सरकारने घोषित केला आहे. या महामार्गाचे रुंदीकरण आणि वारीत सहभागी होणा-या वारक-यांना सुविधा परविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बोपखेल ते आळंदी व्हाया दिघी हा पालखी महामार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जातो. हा महामार्ग महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आला आहे. 60 मीटर रुंद असलेल्या या महामार्गावर पुणे-आळंदी बीआरटी मार्गदेखील तयार करण्यात आला असून, बॅरीकेटस्‌ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरीकेटस्‌चे काम पूर्ण झाले असून, बसथांबे व तांत्रिक कामांची पूर्तता करणे बाकी आहे. या मार्गावर दहा ठिकाणी बसथांबे बांधण्यात येणार  आहेत. मॅगझीन चौक, मोझे स्कूल, साईनगर, ताजणे मळा, गोखले मळा, वडमुखवाडीफाटा, चोवीसवाडी फाटा, च-होली फाटा, पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस आणि काटे कॉलनी अशा दहा ठिकाणी  बस थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सहा बस थांबे स्टेनलेस स्टीलचे आहेत.

स्वयंचलित दरवाजे, दिशादर्शक फलक, बससाठी लागणारे आरएफायडी टॅग, सुरक्षिततेच्या उपाययोजनासाठी अंतर्गत लागणारे दिशादर्शक फलक, स्पीड टेबलस्‌, गतीरोधकवर पांढरे पट्टे मारण्यात येणार आहेत. हे काम मेसर्स कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. या ठेकेदाराला 8 कोटी 13 लाख रुपयांना देण्यास स्थायी समितीने मंजूरी दिली.  येत्या मार्च महिन्यात हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्‍यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.