Talegaon Dabhade : जीवनात जे वसंताचा बहर निर्माण करतात ते संत होय -रामचंद्र देखणे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- उद्दात्त जीवनमूल्याचे प्रकटीकरण संताच्या जीवनातून झालेले आढळते. हे ज्यामधून प्रकटते त्याला संत साहित्य म्हणतात. ज्ञान भक्तीचा साक्षात्कार व कर्माने परोपकार ही संतांची लक्षणे आहेत असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मावळ व योगीराज फौंडेशन आयोजित प्रा दीपक बिचे लिखित ‘पसायदान व तुका झाला पांडुरंग’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक, ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड, माजी आमदार कृष्णराव भेगडे, नितीनमहाराज काकडे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सुरेश अत्रे, आशिष पाठक, श्रीकृष्ण पुरंदरे, रुपाली अवचरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे उपस्थित होते.

देखणे म्हणाले, “संताचे आध्यात्म ज्ञान समाज निरपेक्ष नसून विश्वात्मक आहे. म्हणूनच संतदर्शन हे आत्मकल्याणकारी व विश्वकल्याणकारी आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे आभाळाला गवसणी घालून आकाशाएवढे झालेले एक महान व वंदनीय व्यक्तिमत्व. तुकोबांनी आपले सारे व्यक्तिमत्व पांडुरंगात विलीन केले. तुकोबा पांडूरंगमय झाले. पंढरीचा विठ्ठल आणि तुकोबा यांच्यात अद्वैत निर्माण झाले होते. विश्वकल्याणाचे प्रसाद विश्वात्मक देवाकडं मागितलेला प्रसाद म्हणजे पसायदान” असे देखणे म्हणाले.

अभय टिळक म्हणाले, “तुकोबा विठ्ठलाचे सर्वश्रेष्ठ भक्त होते. सत्याचा शोध हेच त्यांच्या विठ्ठल भक्तीचे प्रयोजन होते. ध्यानीमनी केवळ विठ्ठल आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे हे तुकोबाची समरस व समर्पण भक्ती आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी विठ्ठलाची प्रीत त्यांना लाभली यातूनच तुका झाला पांडुरंग तुका झाला आकाशाएवढा अशी लाभली. पसायदान ही विश्वप्रार्थना आहे प्रार्थना ही सार्वकालिक आहे. त्यात मानवतेचे कल्याणाचा, भल्याचा विचार व तत्व आहे. पसायदान ही लघुज्ञानेश्वरी आहे. पसायदान हे महाराष्ट्र संस्कृतीने जगाला दिलेले एक संस्कृती वैभव आहे” असे टिळक म्हणाले.

भास्करराव आव्हाड म्हणाले, “आजच्या काळात संत साहित्याचा अभ्यास हा तर्कशुद्ध विश्लेषणाच्या द्वारे करण्याची गरज आहे. तरुणाच्या मनात संत साहित्यविषयक असणाऱ्या शंकेचे निरसन होणे आवश्यक आहे. धर्ममार्तंडाच्या विरोधी बंड करणारे तुकोबा हे सामाजिक प्रबोधन करणारे संत होते” असे आव्हाड म्हणाले.

सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पुरंदरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष पाठक, सुचेता बिचे, अरविंद करंदीकर, श्रीकृष्ण पुरंदरे, योगिनी बागडे, शुभम बिचे, निखिल जोगळेकर, मिलिंद दिवेकर आदींनी परिश्रम घेतले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.