Chinchwad: शाहू सृष्टीच्या रखडलेल्या कामावरुन राष्ट्रवादीच्या मंगला कदम आक्रमक

एमपीसी न्यूज – महापालिकेतर्फे चिंचवड, केएसबी चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात उभारल्या जाणा-या शाहुसृष्टीच्या कामाला विलंब होत आहे. चार वर्षांपासून हे काम रखडले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी महासभेत आक्रमक भूमिका घेत आयुक्त, सत्ताधा-यांना खडेबोल सुनावले. तसेच शाहू महाराज जयंतीला पदाधिका-यांना महाराजांच्या पुतळ्याला हार घालू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेची मार्च महिन्याची तहकूब सभा गुरुवारी (दि.6) पार पडली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. हा विषय सभागृहात चर्चेला आल्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी के.एस.बी. चौकातील शाहू महाराज पुतळ्याजवळच्या शाहूससृष्टीचे काम रखडल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

या कामाची निविदा काढूनही हे काम चार वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे येत्या 26 जूनला शाहू जयंतीला महापौर राहुल जाधव यांच्यासह महापालिकेच्या एकाही पदाधिका-याला शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालू देणार नसल्याच्या पावित्रा त्यांनी घेतला. तसेच स्थापत्य विभागाच्या बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”छत्रपती शाहू महाराज यांचा सर्वांनाच अभिमान आहे. त्यांना एका जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवू नका. शाहू महाराजांना हार घालण्यावरून महापौरांना आव्हान द्यायचे, हे योग्य नाही. एखाद्या कामाचा डीपीआर, निविदा या बाबींना वेळ लागतो. शाहूसृष्टी ही शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ व्हावे, नागरिकांनी त्याठिकाणी जावे, याकरिता प्रख्यात दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून ते काम करुन घेण्याचा प्रयत्न आहे”.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील भीमसृष्टी, दिघी-मॅगझीन चौकातील संत नामदेव -ज्ञानदेव भेट शिल्प, शक्‍ती-शक्‍ती समूहाजवळचा लेसर शो व इतर अनुषंगिक अशा स्थापत्याविषयक कामांचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिका-यांची बैठक आयोजित केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.