Pimpri: समाविष्ट गावांचा ‘टीपी स्कीम’ नुसार होणार विकास

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावातील 12 भागांत टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास केला जाणार आहे. आराखडा व नियोजन करून रस्ते बांधून त्या भागांचा विकास केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. दरम्यान, या योजनेवर नगरसेवकांनी प्रश्न निर्माण केले असता आवश्यक आहे तिथेच ही योजना राबविण्यात यावी. ज्या नगरसेवकांचा विरोध असेल. त्यांच्या प्रभागात योजना राबवू नये असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने टीपी स्कीमचा प्रथमच स्वीकार केला आहे. या अंतर्गत शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, चर्‍होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोर्‍हाडेवाडी या 12 भागांचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागात 39 हेक्टर ते 391 हेक्टर इतक्या क्षेत्रफळांचा विकास केला जाणार आहे. शहरातील 30, 50 व 70 टक्के विकास झालेल्या भागांचा प्रथम टप्प्यात निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपसूचनेद्वारे बो-हाडेवाडी, पिंपरी, रहाटणी, पिंपळेनिलख या परिसराचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर, च-होली वगळ्याची उपसूचना मंजूर करण्यात आली आहे.

विकास करताना जागामालकांवर अन्याय होऊ नये, म्हणून टीपी स्कीमचा वापर होतो. सर्वांकडून समप्रमाणात जागा ताब्यात घेऊन प्रथम रस्ते विकसीत केले जाणार आहे. त्यामुळे सर्व बाधितांना चौकोनी आकाराच्या रस्त्याच्या दर्शनी भागात जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्या भागांचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. पन्नास टक्केपेक्षा अधिक जागा ताब्यात घेतल्यास त्यांना पूर्वीच्या 1 एफएसआय पेक्षा अधिक एफएसआय मिळणार आहे.

चांगल्या दर्जाचा आराखडा तयार व्हावा, म्हणून एचसीपी कन्सल्टंटची निवड केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 30 टक्के विकास झालेल्या भागासाठी प्रति हेक्टरसाठी 19 हजार, तर 50 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागात 17 हजार 500 आणि 70 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागासाठी 21 हजार 500 रूपये प्रतिहेक्टर शुल्क आराखडा तयार करण्यासाठी दिला जाणार आहे. महापालिका सभेत याला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.