Nigdi : भर दिवसा मारहाण करत देशी दारू विकणा-या दुकानदाराला लुटले

एमपीसी न्यूज – तीन जणांनी मिळून देशी दारूच्या दुकानात भर दिवसा हैदोस घातला. दुकानदाराच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडत त्याच्यावर कोयत्याने वार करून लुटले. दुकानदार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. ही घटना निगडी येथे बुधवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

प्रदीप खिरडे असे गंभीर जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यांचे निगडी परिसरात देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी ते दुकानात असताना तीनजण दारूच्या नशेत आले. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा होता. एकाने दगडाने दुकानातील टीव्ही फोडला. दुस-याने त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तिसरा दुकानाच्या काउंटरवर चढला आणि त्याने प्रदीप यांच्या कानशिलात लगावली. एकाने प्रदीप यांच्या डोक्यात सुमारे 7 ते 8 दारूच्या बाटल्या फोडल्या. तसेच कोयत्याने वार केले. यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाले. तिघांनी मिळून दुकानातून 22 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. निगडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.