Pimpri: सभागृहनेत्यांच्या प्रभागातील 15 कोटींचा पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव ‘स्थायीत’ तहकूब

निविदेच्या दराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा आक्षेप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या प्रभागातील पर्यटनस्थळ विकसित करण्याचा 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब केला. या निविदा प्रक्रियेत त्रुटी आहेत. आणखी दर कमी होऊ शकतात. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केली. तसेच कशा पद्धतीने पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. याची माहिती नव्हती. त्यामुळे हा प्रस्ताव तहकूब केल्याचे सांगण्यात आले.  

सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर येथील सेक्‍टर क्रमांक 18 सीडीसी मधील मोकळ्या जागेवर पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. त्यासाठी 16 कोटी 3 लाख, 21 हजार 309 रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेस वगळण्यात आले होते. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या मेसर्स बी. के. खोसे या ठेकेदाराने 6.75 टक्के कमी दराने व रॉयल्टी चार्जेस22 लाख, 77 हजार, 515 म्हणजेच 14 कोटी, 96 लाख, 80 हजार, 581 रुपयांवर काम करण्याची तयारी दर्शविली होती.

त्यानुसार या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी ठेकेदाराने कमी केलेल्या दराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कमी केलेला दर हा या निविदा दरांच्या आसपासच असल्याने, ही शुध्द फसवणूक आहे. केवळ याच ठेकेदाराला काम देण्यासाठीच ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रस्तावाला विरोध केला. अखेरीस सत्ताधा-यांनी हा प्रस्ताव तहकूब ठेवला.

राष्ट्रवादीचे मयुर कलाटे म्हणाले, ”स्थायी समितीच्या कामकाजात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींना पायबंद घालण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. त्यांनी आपला हक्क निष्पक्षपणे बजावावा. पर्यटन स्थळाच्या कामाचे दर कमी करताना ठेकेदाराने आपले हित पाहिले आहे. त्याला स्थायीचीदेखील साथ असल्याचे दिसत आहे. निविदा प्रक्रियेतील दराच्या आसपास असलेल्या दरात फारशी तफावत नाही. त्यामुळे यामध्ये महापालिकेचे कोणतेही हित साध्य होत नाही. त्यामुळे या ठेकेदाराने सादर केलेल्या कमी दराला आक्षेप असून आणखी दर कमी होऊ शकतात. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.