Pune : खडकवासला धरणातून 35 हजार 574 क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- खडकवासला धरणातून सकाळी अकरा वाजल्यापासून 35 हजार 574 क्युसेक इतका विसर्ग चालू करण्यात आला असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून अनुक्रमे 12 हजार 936 व 9 हजार 35 क्युसेक विसर्ग चालू असून पावसाचा जोर वाढल्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण 41हजार 756 क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

आज, रविवारी सकाळी 6 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण परिसरामध्ये मागील 24 तासात 32 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत 791 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.97 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 24 तासात 123 मिमी पाऊस झाला असून पाणी पातळीमध्ये 10.65 टीएमसीने वाढ झाली आहे. यंदाच्या मोसमात आजपर्यंत 2210 मिमी इतका पाऊस पानशेत धरण परिसरामध्ये झाला असून धरण 100 टक्के भरले आहे.

वरसगाव धरणामध्ये मागील 24 तासात 120 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये आजपर्यंत 2198 मिमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 12.62 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 98.46 टक्के भरले आहे.

टेमघर धरण पाणलोटक्षेत्रामध्ये मागील 24 तासामध्ये 111 मिमी पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात आजपर्यंत एकूण 3044 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 3.23 टक्के इतकी वाढ झाली असून धरण 87.19 टक्के भरले आहे.

चारही धरणात सरासरी 97.69 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून 28.48 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी याच दिवशी चारही धरणे सरासरी 87.17 टक्के भरली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.