Pune : लघुशंकेकरिता गेला अन नाल्यात बुडाला; अग्निशमन दलाकडून जीवदान

एमपीसी न्यूज- लघुशंकेकरिता नाल्याच्या कडेला उभा असताना पाय घसरून नाल्यात बुडालेल्या युवकाला वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले. ही घटना गणेश पेठेतील बुरडी पुलाजवळ शनिवारी (दि. 3) मध्यरात्री दोन वाजता घडली. त्याला पोहायला येत होते. पण पाण्याच्या प्रवाह एवढा होता की हा युवक नाल्यातील एका कप्प्याजवळ अडकला. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्याची सुटका करण्यात आली.

मुख्यालयातून एक पथक घटनास्थळी पोहोचताच जवान प्रकाश शेलार यांनी प्रवाहात उडी मारत सोबत रस्सी व बॅटरी घेऊन घेत शोध सुरु केला. आतमधे पहिली फेरी मारत काहीच न मिळाल्याने शेलार बाहेर आले. जरा उसंत घेत परत डुबकी मारत शोध घेतला असता अडकलेला युवक शेलार यांच्या नजरेस पडला. युवकाची फक्त मानच पाण्याबाहेर होती व अशा परिस्थितीत तो फोनवरुन संपर्क करित होता. क्षणाचाही विलंब न करता युवकास रस्सी बांधून त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले. ‘अग्निशामक दलाचे जवान येणार व मला सुखरुप बाहेर काढणार हे मला माहीत होते’ असे सुटका झाल्यावर या युवकाने म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.