Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा

एमपीसी न्यूज- रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात या मागणीसाठी गुरुवारी (दि. 7) वडगाव मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर, सचिव अॅड. केतन सातकर यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सातकर यांनी म्हटले आहे की, कान्हे-नायगाव परिसरात असलेल्या महिंद्रा ग्रुपच्या विविध कंपन्यांमधून स्थानिक बेरोजगार व भूमिपुत्र तरुणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात म्हणून रोजगार व व्यवसाय कृती समिती मागील वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु कंपनी प्रशासन याची दखल घेत नाही. समितीने मागील पंधरा ते सोळा महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी कंपनी प्रशासनाबरोबर रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात यासाठी अपेक्षित पत्रव्यवहार व चर्चा केली मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

त्यामुळे यावर्षी 19 जुलै रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाची नोटीस देण्यात आली होती. तत्कालीन कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र झालेल्या चर्चेनुसार बाळा भेगडे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि. 7) सकाळी साडेदहा वाजता पोटोबा महाराज मंदिर ते वडगाव मावळ तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये भूमिपुत्र बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर, सचिव ऍड. केतन सातकर, तसेच कार्यकारिणी सदस्य मदन शेडगे, विजय सातकर, प्रदीप ओव्हाळ, गौरव सातकर, संदीप सातकर, शशिकला सातकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1