राष्ट्रवादी सोमवारी गटनेता जाहीर करणार ?

पदासाठी 13 नगरसेवक इच्छुक

एमपीसी न्यूज – पुणे महालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता या पदासाठी पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या दरम्यान 13 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मात्र, यात कोणताही ठोस निर्णय झाला नसून सोमवारी गटनेता जाहीर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पक्षाकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मागील 10 वर्षांपासून पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने सत्ताधारी म्हणून काम केले. मात्र, यंदा 2017 च्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मतदान केल्याने फक्त 38 जागा मिळाल्या. तर भाजपला सर्वाधिक 98 जागा मिळाल्याने महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे भाजपला मिळणार असून विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे मांडेल, असा गटनेता निवडण्याकडे राष्ट्रवादीचा कल राहील. यासाठी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या दरम्यान, नगरसेवक विशाल तांबे, बंडू गायकवाड, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, चंचला कोद्रे, नंदा लोणकर यांच्यासह 13 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, यावेळी कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नसून बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता गेले. तसेच उद्या (सोमवारी) गटनेता निवडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरील पैकी कोणत्या इच्छुकाला अजित पवार संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

"advt"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.