बोपखेलच्या आंदोलनातून पळ काढणा-यांना मतदान करू नका – अजित पवार

एमपीसी न्यूज – बोपखेल येथील रस्ता मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजने (सीमई) बंद केल्याने नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलना दरम्यान आता निवडणूक लढवत असलेल्या विरोधी पक्षातील लोकांनी पळ काढला होता. त्यामुळे नागरिकांनी अशा पळपुट्या लोकांना मतदान करू नये असे आवाहन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोपखेल येथील जाहीर सभेत केले. 

यावेळी दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत लक्ष्मण इंगळे (अ), बाळू गंगाराम लांडे (ब), वृषाली समीर झपके-घुले (क), कल्पना चंद्रकांत वाळके (ड), नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दिघी-बोपखेल प्रभागात राष्ट्रवादीला सुशिक्षित महिला उमेदवार द्यायची होती. त्या उमेदवाराला कुणबी दाखला मिळू नये यासाठी सत्तेच्या जोरावर काही जणांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे जनतेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देऊन, विरोधकांची दादागिरी मोडून काढावी, असेही अजित पवार म्हणाले. बोपखेलचा पूल मंजूर झाला आहे. त्यासाठी महापालिका सभेने निधी मंजूर केला आहे. लवकरच पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार, असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त उद्याने क्रीडांगणे, अत्याधुनिक रुग्णालये, स्पर्धा परीक्षा केंद्रांसह ग्रंथालये, नाट्यगृहे, शिवसृष्टी विरंगुळा केंद्रे, सायन्स पार्क उभारून शहराचा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आदी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधला आहे. दिघीमध्ये पोलीस स्टेशनची इमारत, बंदिस्त कचरा डेपो सुरू केला आहे. सर्वधर्मियांसाठी एकच दफनभूमी दिघीत आहे. 

राष्ट्रवादीचे चारही उमेदवार सुशिक्षित आणि अनुभवी आहेत. त्यामुळे दिघी-बोपखेलचा राहिलेला विकास करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन, अजित पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.