गोरक्ष लोखंडे यांची दहा दिवसांसाठी स्थायी समिती सदस्यपदी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडची महापालिकेची निवडणूक संपली असली तरी अद्याप चालू सभागृहाची मुदत संपलेली नाही. त्यामुळे आज (सोमवारी) तहकूब स्थायी समितीची बैठक पार पडली. यामध्ये स्थायी समितीच्या शुभांगी लोंढे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी अवघ्या दहा दिवसासाठी गोरक्ष लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका चालू सभागृहाची मुदत 13 मार्च 2017 पर्यंत आहे. त्यामुळे तहकूब स्थायी समिती व महापालिका सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. स्थायी समितीच्या आज तब्बल सहा सभा घेण्यात आल्या. यावेळी स्थायी समितीच्या  सदस्या शुभांगी लोंढे यांनी निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी गोरक्ष लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे औट घटकेसाठी  का असेना लोखंडे यांना स्थायी समितीपद मिळाले.

उद्या स्थायी समिती सदस्यासह आठ सदस्यांची मुदत संपणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हिरानंद आसवाणी यांची उद्या मुदत संपणार आहे. आसवाणी यांच्या बरोबरच स्थायी समितीच्या सविता साळुंखे, अनिता तापकीर, कैलास थोपटे, जालिंदर शिंदे, विमल काळे, संपत पवार धनंजय आल्हाट यांचाही कार्यकाल संपणार आहे. त्यापैकी जालिंदर शिंदे यांनीही नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

या सदस्यांची उद्याची स्थायी समिती सभा ही शेवटची सभा असणार आहे. त्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसांसाठी स्थायी समिती सदस्य व अध्यक्ष यांची निवड करावी लागणार आहे. मात्र, या काळात कोणताही मोठा निर्णय त्यांना घेता येणार नाही.

नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांची 13 मार्चनंतर नवीन स्थायी समिती नेमण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.